मुलीच्या जन्माला नकार देणे महापाप- डॉ. सुधा कांकरिया


माय नगर वेब टीम

अहमदनगर- मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही. मुलीच्या जन्माला नकार देणे हे महापाप आहे.मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता मुलीला जन्म दिला पाहिजे. तीला चांगले शिक्षण दिले पाहिजे.मुलीच्या जन्माचे स्वागत हे आनंद सोहळा साजरा करून केले पाहिजे असे प्रतिपादन स्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉ.सुधा कांकरिया यांनी केले.

जागतिक मातृ दिनानिमित्त अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्था यांच्या वतीने पहिले अपत्य असलेल्या मुलीला जन्म देणाऱ्या माता पित्यांचा सत्कार व मुलीच्या नावे १ हजार रुपयांची ठेव पावती प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कांकरिया बोलत होत्या. यावेळी डॉ.अविनाश मोरे,अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थापक संचालक दिलीप गुंजाळ, अंबादास गुंजाळ, सौ. वनिता गुंजाळ, संतोष काळे, सागर विटकर, करिष्मा शेख, भगवान भोपळे, बाळाजी तनपुरे, सुनील सहाणे, नामदेव जाधव, अक्षय जेजुरकर, दिलीप खांडरे,अश्विनी हराळे,डॉ.संदेश बांगर, राजू पाटोळे, सुनील गुंजाळ, सुनील धनवटे, सिराज शेख आदी उपस्थित होते.

डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्था यांच्या वतीने स्री जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्याचा हा राबविलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज झाली आहे. या संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात अनेक संस्था या कार्यात सहभागी होवू शकतात.

दिलीप गुंजाळ म्हणाले, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्थेने नेहमीच समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला आहे. आज समाजात मुलगा, मुलगी हा भेदभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुलगी ही समाजातील एक महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाने स्री जन्माचे स्वागत करून मुलींचा गौरव केला पाहिजे. या विचारातूनच आज आमच्या संस्थेने पहिले अपत्य असलेल्या मुलीला जन्म देणाऱ्या माता पित्यांचा सत्कार व मुलीच्या नावे १ हजार रुपयांची ठेव पावती प्रदान या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post