टँकर्सद्वारे नियमित खेपा करून पाणी पुरवठा करा- पालकमंत्री प्रा.शिंदे यांचे निर्देश


माय नगर वेब टीम

अहमदनगर - जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने दुष्‍काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा आज (सोमवारी) राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍ट्राचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी घेतला. विविध गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकर्सद्वारेहोणारा पिण्याचा पाण्याचा पुरवठा नियमित व्हावा. ठरवून दिलेल्या खेपा होतील याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.



जिल्हा परिषद येथे दुपारी 3 वाजता ही बैठक पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील,अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौन्फरन्सद्वारे घेतला. त्यानंतर या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, येणाऱ्या अडचणी, गावांची मागणी, विशेषता चारा छावणी, पाणी टँकर्स, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, बुडकी खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, खाजगी विहीर अधीग्रहण, टँकर्सद्वारे पाणीपुरवठा,प्रगतीपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नविन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करणे आदी उपाययोजनांचा आढावा प्रा. शिंदे यांनी घेतला. विविध यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. प्रशासनाने यापूर्वीच दुष्काळ निवारण कामे करण्यासाठी आराखडा मंजूर केला आहे. या कृती आराखड्यातील हाती घेण्यात आलेल्या कामांचा तपशीलवार आढावा विविध यंत्रणांकडून त्यांनी घेतला.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध सवलतींची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे,लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचतो किंवा नाही हे त्यांनी जाणून घेतले. कृती आराखड्यातील कामे पूर्ण करण्यास कोणत्याही प्रकारची दिरंगाई करु नका, असे त्यांनी यंत्रणांना बजावले.

जिल्ह्यात सध्या बाराशे कामे रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असून बारा हजारावर मजुरांची या कामावर उपस्थिती आहे. कोणत्याही गावातून कामाची मागणी झाल्यास तीन दिवसांत संबंधिताऩा कामे उपलब्ध तरुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या ग्रामपंचायतीमार्फत सुरु असणाऱ्या कामांवर 5 हजार 547 मजूर उपस्थिती असून यंत्रणांमार्फत सुरु असलेल्या कामांवर 5हजार 709 एवढी मजूर उपस्थिती आहे.

जिल्ह्यात सध्या 503 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून 493 चारा छावण्यासुरु आहेत. या छावण्यांतील जनावरांची 15 मे पासून संगणकीय पद्धतीने नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने छावणीचालकांना अद्यापपर्यंत टँग पुरविले नाहीत. जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीला याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात,असे प्रा. शिंदे म्हणाले. छावणी चालकांच्या देयकांना जीएसटी लागणार नसल्याचे यापूर्वीच राज्य शासनाने स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत छावणीचालकाऩा 23 कोटी 80लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. छावण्यांमध्ये असलेल्या पशुधनाची नियमित तपासणी करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या.

राज्य सरकारकडून दुष्काळ बाधित शेतकऱ्यांसाठी आलेले 400 कोटी रुपयांचे अनुदान 6 लाख 36 हजार 790 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रशासनाने दिली. तसेच कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग झालेली रक्कम, विविध अनुदानापोटी मिळालेली रक्कम यांचाही त्यांनी आढावा घेतला. अनुदानासंदर्भात अथवी कर्जमाफीसंदर्भात शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post