रोहितदादांना उमेदवारी द्या- कार्यकर्त्यांचे शरद पवारांना साकडे
माय नगर वेब टीम
जामखेड- ‘साहेब रोहितदादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ असे साकडे राष्ट्रवादीच्या जामखेडमधील कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे घातले. यावर पवारांनी दिलेली दिलखुलास दाद कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो संदेश देणारी ठरली. यावेळी गाडीत मागे बसलेल्या नातू रोहितकडे कटाक्ष टाकत “तुझी मागणी झाली” असे पवार म्हणताच रोहित पवारांच्याही चेहर्यावर “लढण्यास सज्ज” असे भाव उमटले.
अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर महाराष्ट्रातील दुष्काळी भागाच्या दौर्यावर आहेत. सोमवारी बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौ-यावर जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या जामखेड येथील निवासस्थानी काही काळ थांबले होते. पवार यांच्यासमवेत नातू रोहित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, मेहबूब शेख, शिवाजी राऊत, सतिश शिंदे हे पदाधिकारी सोबत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी जामखेडच्या दुष्काळी परिस्थितीत सत्ताधार्यांकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. प्रा मधुकर राळेभात, सुरेश भोसले, अमजद पठाण यांनीही दुष्काळाच्या समस्यांवर लक्ष वेधले. यावेळी जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्यांनी वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन पवारांना देऊन जामखेडच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली. जामखेड शहराला २० ते २२ दिवसांनी पिण्यासाठी नळावाटे पाणी पुरवठा होतो. मात्र, तेही पाणी अस्वच्छ असते, अशा तक्रारी केल्या़. त्यावर तुम्ही पुरावे द्या,पुढचे मी पाहतो, दुष्काळी दौरा संपताच जामखेडचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, असे सांगत पवारांनी जामखेडचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
Post a Comment