आता मोबाइलप्रमाणे सेट टॉप बॉक्स होणार ‘पोर्टेबल’



माय नगर टीम

पुणे - मोबाइलला ज्याप्रमाणे नंबर पोर्टेबलिटीची सुविधा मिळाली आहे, तशी सुविधा आता सेट टॉप बॉक्सच्या बाबतही लागू होणार आहे. ग्राहकांना त्यांनी घेतलेली डीटीएच किंवा केबल सेवा बदलायची झाल्यास त्यांना आता सेट टॉप बॉक्स बदलण्याची गरज पडणार नाही. या वर्षाच्या अखेरीस ही व्यवस्था केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातर्फे लागू केली जाणार आहे.


ग्राहकांना एखाद्या डीटीएच कंपनीची किंवा केबलची सेवा न आवडल्यास ते सेवा देणारी कंपनी बदलतात. पण नव्या कंपनीची सेवा घ्यावीची असल्यास नव्याने सेट टॉप बॉक्स खरेदी करावा लागत होता. आता मात्र, तशी परिस्थिती उद्भवणार नाही. ग्राहकांकडे कोणत्याही कंपनीचा सेट टॉप बॉक्स असला, तरी त्याच्याद्वारे इतर कंपन्यांचेही चॅनेल्स पाहता येणे शक्य होणार आहे. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी 'ट्राय'ने दोन वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची चाचपणी सुरू केली आहे. त्यामध्ये 'स्मार्ट कार्ड बेस्ड सोल्युशन' आणि 'डाउनलोडेबल कंडिशनल अॅक्सेस सर्व्हिस' अशा दोन प्रणालींचा समावेश आहे. 'स्मार्ट कार्ड बेस्ड सोल्युशन' या प्रणालीमध्ये ग्राहकांनी विशिष्ट कंपनीचे स्मार्ट कार्ड कोणत्याही सेट टॉप बॉक्समध्ये टाकल्यास त्याद्वारे त्या कंपनीचे डीटीएच कनेक्शन ग्राहकांना मिळणार आहे. दुसऱ्या तंत्रज्ञानामध्ये ग्राहकाच्या सेट टॉप बॉक्समध्ये जे कार्ड असेल त्याचा एक आयडी ग्राहकांना मिळेल. डीटीएच कंपन्या तो आयडी देतील. त्यावर रिचार्ज केल्यानंतर हवे ते चॅनेल्स पाहण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. रिचार्ज केले नाही, तर मोफत असलेल्या चॅनेलचा आनंद ग्राहकांना घेता येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post