नगरमध्ये 'या' भागात होतो गुंडांकडून जागा बळकावण्याचा प्रयत्न!



सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त; पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी

माय नगर वेब टीम

अहमदनगर - बुरुडगाव रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग यांच्यावर दहशत निर्माण करुन जागा बळकाविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भात शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांची शैलेश गांधी, कमलेश भंडारी, सुवेंद्र गांधी, निलेश पोखरणा, प्रमोद डागा, प्रदीप गांधी, सुरेश गुंदेचा, पिटू कटारिया, शिरीष ओझा, मनिषा लोढा, विजय गांधी, श्रेयेश पोखरणा, ईश्वर पोखरणा, संतोष लोढा, राजेश बोरा, नितीन शिंगवी यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, बुरुडगावरोड परिसरातील मोकळ्या जागा, बंगले, गोडाऊन यावर विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बेकायदेशीरपणे ताबा घेत दहशत केली जात आहे. जागा मालकांनी जर विरोध केला तर पोलिसात तक्रार करुन अॅट्रॉसिटी, विनयभंग, महिलांवर अत्याचार या सारखे खोटे पण गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामध्ये निरापराध लोकांचे आयुष्यच उध्वस्त होत आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना जामीन मिळत नसल्याने अटकेची, मालमत्ता गिळंकृत होण्याची भिती आणि त्यामुळे होणाऱ्या बदनामीला कंटाळून मालमत्ताधारकांना या गुन्हेगारांशी मोठ्या आर्थिक तडजोडी कराव्या लागत आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे.

हा परिसर दहशतमुक्त करण्यासाठी या भागातील मोकळ्या जागा, बंगले, गोडाऊन यांच्या मालकांकडून पोलिसांकडे विनंती अर्ज आल्यास संबंधित मालमत्तांचे पोलीस प्रशासन, तलाठी कार्यालय यांच्याद्वारे पंचनामे करण्यात यावेत आणि जागा बळकावण्याच्या उद्देशाने अतिक्रमणे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. माजी महापौर भगवान फुलसौंदर व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल झालेले गुन्हेही अशाच प्रकाराचे खोटे आहेत. असेही या शिष्टमंडळाने सांगितले. यावर या परिसरात तातडीने पोलीस चौकी सुरू करण्यात येईल असे आश् वासन उपाधीक्षक मिटके यांनी दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post