"छावणी"






माय नगर वेब टीम

२०१८ साल पावसाअभावी अगदी कोरडे ठीक्कर गेले, कसेबसे रडतकडत शेतकऱ्यांनी ते पूर्णत्वास नेले. २०१९ साल उजाडले आता मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे काळेकुट्ट ढग जोरात वाहू लागले होते. ज्यांच्याकडे जनावरे नव्हती त्यांना थोडं हायसं वाटलं, उत्पन्न तर नाही,परंतु जवळ असलेले दहा-वीस रुपये, चाऱ्यासाठी खर्च होणारे, ते तरी वाचतील या विचाराने ते थोडे सुखावले. परंतु दूग्ध व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांना तर कुणीतरी जोरात कानशिलावर मारावी आणि डोळ्यासमोर फक्त अंधार दिसावा एवढी भयंकर परिस्थिती उद्भवली. जनावरे विकावी तर पोट कसे भरावे आणि नाही विकावी तर त्यांच्यासाठी चारापाण्याची व्यवस्था कशी करावी या विचाराने शेतकऱ्यांच्या काळजावर ओरखडे ओढले जात होते. "इकडे आड आणि तिकडे विहीर" या द्विधा विचारात शेतकरी अडकला होता. मागील वर्षीचा जो थोडाफार चारा शिल्लक होता त्यानेही आता आपले हात वर केले होते. आता मात्र दुष्काळ नावाचे महाकाय भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवरचे काही केल्या उतरणार नाही, हे सर्वांना अगदी स्पष्ट दिसत होते.


सरकारने दुष्काळी भागाची पाहणी केली आणि अहवाल मिळाला, आणखी तीन महिने पुरेल एवढा चारा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आहो चार शेतकऱ्यांकडे चारा होता,परंतु बाकी लोकांनी काय करायचं मायबाप सरकार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या हृदयातून ओठापर्यंत येत होता. आता मात्र शेतकऱ्यांच्या पायाखालची जणू मातीच सरकली. छावण्यांना तूर्तास परवानगी मिळणार नाही, हे जाहीर झाले. अव्वाच्या सव्वा बाजारभावाने शेतकऱ्यांनी ऊस आणून जनावरांची पोटं भरली. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शेतकरी जनावरांचे पोट भरू लागला. प्रत्येकाच्या डोक्यात एकाच विचाराने फेर धरला होता, की आपलं पशुधन वाचलं पाहिजे. पण पशुधन वाचवण्याच्या नादात स्वतःच्या शरीरातला रक्ताचा थेंब ना थेंब त्यांच्या विचारापाई आटत चालला होता आणि स्वतःचा प्राण मात्र पणाला लागत होता.

घरात जे काही थोडेफार पैसे होते तेही शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी संपवले. बायकोच्या अंगावरील दागिने सुद्धा बँकेत तारण म्हणून ठेवले आणि आपल्या जनावरांना वाचवलं, खूपच दयनीय अवस्था झाली, पण गोठ्यातली गाय आणि धरणी माय कितीही संकट आले तरी कधी पणाला लावायची नसते,हे शेतकरी पुरता जाणून होता.

२०१९ची तब्बल तीन महिने उलटून गेली तरीही ना चाऱ्याची सोय, ना छावण्यांची, आता मात्र शेतकरी राजा घायकुतीला आला होता. काय करावे आणि काय करू नये या विचाराने त्याच्या काळजात कपार पडल्यासारखं व्हायचं. काही शेतकरी, विविध शेतकरी संघटना,मोर्चे-आंदोलने करत होते, तेव्हा कुठे निद्रिस्त सरकार जागे झाले आणि बऱ्याच दिवसांचे भिजत घोंगडे एकदाचे मार्गी लागले. छावण्यांना परवानगी मिळाली. दुष्काळात पानगळ झालेल्या झाडाला चैत्रामध्ये थोडीशी पालवी फुटावी आणि त्या नवलाईने ते झाड आनंदाने फुलून जावे,तसे शेतकऱ्यांना झाले.

आता जो तो कागद, कापड, बांबू आणने आणि छावणी बनवणे या कामात गुरफटून गेला होता. किती किती नव्हे ती प्रत्येकाच्या प्रयत्नांची शिकस्त चालू होती. आता आपल्या जनावरांना जीवदान मिळणार या विचाराने सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा स्पष्ट दिसत होती.आणि खिशाला लागलेली कात्रीही थांबणार, ह्या विचाराने प्रत्येकाच्या मनाला उभारी मिळत होती.

छावण्या तयार झाल्या, आता लोकांची लगबघ सुरू झाली,जनावरे आणने,त्यांना व्यवस्थित बांधणे, कुट्टी मिळो अथवा ऊस,तो घ्यायचा आणि आपल्या जनावरांच्या मुखी घालायचा हेच सत्र सुरू झाले. चारा मिळाला की पाणी कधी येतय ह्याच चिंतेत, त्यासाठी टँकरच्या आवाजाकडे सर्वांच्या नजरा लागून राहायच्या. पाण्याचा टँकर आल्यानंतर सर्वांचीच धावपळ व्हायची. टँकरवाल्याला म्हणायचे अरे सकाळपासून आमच्या जनावरांना घोटभर पाणी नाही अगोदर आम्हाला पाणी दे ना भाऊ. टँकरवाला म्हणायचा नाही,आहो आज तुमचा नंबर उशिरा आहे. अगोदर खालच्या लाइनला द्यावे लागेल. मग जनावरे तसेच कधीकधी भर उन्हाळ्यात पाण्यावाचून दिवसभर ठेवावे लागत असे. कधी शेजाऱ्यांकडून थोडेफार पाणी आणून तेच पाजत असत. छावणीमध्ये मधमाशाप्रमाणे सर्व जनावरे जवळ जवळ असल्यामुळे कधीकधी त्यांचा एकच गलका व्हायचा कोणाचे जनावर ओरडतय आणि कोणाचे नाही याचा थांगपत्ताही लागत नसे. कधीकधी तर एखाद्याच्या छावणीत वारा घुसला की छावणीची छत्री होत असे, मग एकच कल्लोळ व्हायचा अरे पळापळा छावणी उडाली. मग सर्वांनी धावत जाऊन छावणी ओडून बांधायची, सर्व व्यवस्थित करायचं. ज्याने उभ्या हयातीत शेण टाकायचं कष्ट घेतल नाही, तो ही इकडे-तिकडे पाहून घुमानं शेण टाकू लागला.



एखाद जनावर जर चुकून सुटलंच तर मालकाची त्याला धरताना मात्र त्रेधातिरपीट होत असे. ते जनावर किमान तासभर तरी हाती लागत नसतं, त्याच्याबरोबर मालकाचाही पूर्ण छावणीला फेरफटका घडून येत. काही जनावरांची अवस्था तर एवढी बिकट की समोर टाकलेल्या उसाच्या कांड्या चावण्या इतकाही त्राण त्यांच्या शरीरात उरला नव्हता. ऊस खाऊन खाऊन अगदी लदलद जनावरेही पार रोडकी होऊन गेली होती. सहजच जोराचा वारा आला तर जमिनीवर कोसळतील की काय,अशी शंकेची पाल शेतकऱ्यांच्या मनात नेहमी चुकचुकत असे. एखाद्या जनावराने दिवसभर शेपटीच हलवली नाही तर लोक म्हणायचे याचा अवतार संपला आता. छावणीत माशांचं तर एवढं साम्राज्य पसरलेलं की, जनावरांच्या अंगावर केस कमी एवढ्या माशा. दूध काढताना एखादी माशी गाईला चावली आणि दूध सांडले तर दिवसभराचा सगळा धंदा चौपट होत असे. सर्व जनावरे फक्त दिसायला,नाहीतर अंगावर त्यांच्या चमडी आणि हाडाचा सांगाडा सोडता कुठे मांसाचा लवलेशही राहिला नव्हता. अगदी खोलवर गेलेले डोळे, पोटाचे कातडे एकमेकाला चिकटलेले, कान खाली पाडलेले, सर्वांगाने काटा मारलेला, शेतकऱ्यांसारखी त्यांच्याही डोळ्यातून सदैव आसवे गळत, कदाचित शेतकऱ्यांचे दुःखही त्यांना कळत असावे. अशी वाईट अवस्था की पाहणाऱ्याच्या नजरेला ही वेदना होऊन काळजाचं पाणी पाणी व्हायचं.

लोकांना छावणीत जा आणि घरी ये हाच मोठा उद्योग लागला होता. जनावर तर "एक ना धड भाराभर चिंध्या"असे झाले होते. वीस लिटर दूध देणारी गाई सुद्धा ओढून ताणून दहा-बारा लिटर दूध देत असे. काही जनावरांची अवस्था तर फारच बिकट झाली होती त्यांना बसली जागा उठवत नव्हती. काहींना तर रोज सकाळ-संध्याकाळ अंगाखाली काठ्या घालून उचलून उठवून बसवावे लागत.दररोज एकच खाद्य त्यामुळे शरीरातील कॅल्शियम तसेच इतर खनिज द्रव्ये कमी होऊन जनावर जागीच बसत,कधीकधी तर काही तिथेच गतप्राण होत असे.मग मालक बिचारा दोन-दोन दिवस जेवत नसे. कारण स्वतःच्या लेकरागत त्याला जीव लावलेला असतो.स्वत:च्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेले जनावर डोळ्यादेखत मरणं यापेक्षा वाईट दिवस शेतकऱ्यासाठी कोणता असू शकतो. अशी कितीतरी जनावरे छावणीत मरत असे.ढगातून सालभर थेंब कोसळला नाही, पण हे सर्व पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र दुःखाचे अश्रू रोजच टपकत असे. जनावरांना झालेल्या जखमा कितीतरी दिवस त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बऱ्या होत नसत.

काही छावणी चालकांनी तर खूप पिळवणूक केली गोरगरिब शेतकऱ्यांची. १८ किलो चाऱ्याऐवजी कधीकधी १५ किलो, तर एखादवेळी अर्धेच माप दिले जाई. नंतर देऊ असे सांगून माप देत असत, त्यांचा नंतर कधी आलाच नाही. "तोंड दाबून बुक्क्यांचा मार"अशी गत झाली होती शेतकऱ्यांची, मग लोक काय करणार बिचारी पाठीमागे शिव्या-श्राप देऊन मनातले दुःख कमी करायचे. कधी कधी तर छावणी चालकांची एवढी मुजोरी चाले की, ज्याला जमत नसेल त्याने गुरं घरी घेऊन जावे,असे म्हणत. पण शेतकरी"अडला हरी गाढवाचे पाय धरी"याप्रमाणे सर्व काही निमुटपणे सहन करत.

छावणीत दुपारच्या वेळी कुणी कुणी पत्त्या खेळत असे, तर कुणी झोपा काढत, कुणाकुणाच्या गप्पांना फार उधाण येत असे.मग कुणी म्हणायचे असा दुष्काळ आम्ही उभ्या आयुष्यात पाहिला नाही. आमच्या काळी भरपूर पाणी असायचं,आम्ही उन्हाळ्यामध्ये शेतात जनावरं चारायला गेलो तर डोंगराच्या कडेला कुठबी कडेकपाऱ्यात हाताने पाणी घेऊन प्यायचो, आता काय ही परिस्थिती आली. तर कुणी म्हणे लोकांची नीतिमत्ताच बदलली म्हणून निसर्गही बदलला. काही विचारी लोक म्हणायचे, माणसाचे जीवन हे फुलांसारखेच असते का?कारण एकाच शेतात उमललेली फुल,पण काही देवाच्या पूजेसाठी जातात,काही सजावटीसाठी जातात, काही पायगड्यांवर पायदळी टाकले जातात, तर काही प्रेतावर टाकले जातात. त्याचप्रमाणे देवाने मानव जात बनवली, परंतु"काही तूपाशी तर काही उपाशी" हा भेदभाव का? शेती करणारे शेतकरी आणि पायदळी टाकलेली फुले यांच्यात तरी फरक उरलाय कुठे, कारण दोघांच्याही नशीबी तिरस्कार अथवा हेळसांडच आहे. खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात शेतकऱ्यांना. छावणीला चारा ऐवजी दावणीला चारा दिला असता तर काय बिघडलं असतं सरकारच,किमान आम्हाला घरी दोन घास सुखानं खायला मिळाले असते, असे खुप सारे जिव्हाळ्याचे विषय लोकांच्या मुखातून बाहेर येत असत. काहींचा तर कंठ दाटून येत असे बोलताना,छोटी-छोटी मुलं एका ठिकाणी, आई-वडील एका ठिकाणी तर नवरा-बायको भलत्याच ठिकाणी या सर्वांची ताटातूट छावणीने झाली होती. एकत्र कुटुंब या छावण्यांमुळे विभक्त झाले. खूप सारे बदल या छावणीने घडवून आले. जवळची माणसं दुरावली तर दूरची काही जवळ आली.सग्यांपासून अंतर मिळायला लागलं, तर इच्छा नसताना परक्यांशी संधान बांधावं लागलं.

केवळ आर्थिकच नव्हे तर इतरही खूप सारे बदल शेतकऱ्यांच्या जीवनात घडून आले. एरवी जिथं कधी माणसाचा लवलेश नव्हता, तिथे आज माणसांची वर्दळ वाढली. डोंगराच्या कडेला पठारावर ओसाड पडलेल्या जागेवर आज माणसं रात्री-बेरात्री बिनधास्त जनावरांसाठी वास्तव्य करू लागली.

शेवटी छावणीचे दिवस आपल्यावर का आले याचाही विचार होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टीला तुम्ही-आम्ही सर्व मानव खऱ्या अर्थाने जबाबदार आहोत. अवास्तव प्रमाणात वृक्षतोड,कॉंक्रिटीकरण, औद्योगीकरण या सर्वांमुळे वृक्षांच्या जागेवर सिमेंटचे जंगल तयार झाले. त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे आज काळाच्या पडद्याआड गेले आणि सिमेंटचे घरच आमचे सोयरे म्हणणारे तयार झाले. या सर्व गोष्टीला मानवाची बेताल वागणूक खऱ्या अर्थाने जबाबदार‌ आहे. पाण्याचा अवाजवी वापर, अनावश्यक वृक्षतोड या सर्वांमुळे निसर्गानेही आपली साथ सोडली. व आपल्या सर्वांवर आज दुष्काळ,छावणी अशा प्रकारची संकटे ओढली गेली.हीच परिस्थिती राहिली तर आपल्याला एक दिवस पेट्रोलच्या दराने पाणीही विकत घ्यावे लागेल. वेळीच सावध होणे आवश्यक आहे. प्रत्येकानं पाणी, वृक्ष या सर्वांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तर कुठे आपण भविष्यातील भयानक परिस्थितीशी दोन हात करू. नाहीतर आपला सर्वनाश अटळ आहे. कितीही पैसा कमावला तरी शेवटी पिण्यासाठी पाण्याचीच गरज आहे आणि उन्हा-तान्हात शेतामध्ये, रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी झाडाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून त्याची तजवीज करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये, बांधावर,घराभोवती किमान पाच-दहा झाडे लावावीत. जगासाठी नाही, परंतु आपल्यासाठी कारण भविष्यात आपलीच पिढी झाडाखाली बसणार आहे, त्या झाडाची फळे चाखणार आहे,हा विचार पूसटसाही मनाला शिवला तरी आपण सुधारणेच्या विचाराकडे काही प्रमाणात का होईना झुकलो आहोत असे म्हणण्यास हरकत नाही. शेवटी"चमत्कारालाच नमस्कार"मिळतो हे प्रत्येकाने ध्यानी घ्यावे. बोलून काही होत नाही, कर्तृत्वालाच किंमत आहे. कर्तृत्वशून्य माणसाने कितीही गाजावाजा केला तरी लोक ऐकणार नाही. सुरुवात स्वतःपासून असावी, तर आपले अनुसरण होईल. आणि सुखाची शितल गंगामाई आपल्या दारी येईल व छावणीसारखे भयानक दिवस आपल्यावर येणार नाहीत.







लेखक,
श्री. अजिनाथ सासवडे (सर)
मु. पो. लोणी(सय्यदमीर), आष्टी
मो.९४२१३३६०५९

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post