मुख्यमंत्री २४ ऑगस्टला नगरमध्ये ; गांधी मैदानात जाहीर सभा


माय नगर वेब टीम

अहमदनगर- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी २ ऑगस्टपासून सुरु केलेली व नंतर पुरपरिस्थितीमुळे स्थगित झालेली महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होत असून दुसऱ्या टप्प्यातील ही यात्रा दि.२४ ऑगस्ट रोजी नगर शहरात येणार आहे. शहरातील गांधी मैदानात मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

या सभेच्या पार्श्वभुमीवर गांधी मैदान परिसराची सोमवारी (दि.१९) सकाळी माजी खा.दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पाहणी केली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, सरचिटणीस किशोर बोरा, नरेंद्र कुलकर्णी, सागर गोरे, उपायुक्त प्रदीप पठारे, शहर अभियंता व्ही.जी.सोनटक्के, अभियंता श्रीकांत निंबाळकर, घन कचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. एन.एस.पैठणकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या तयारीच्या दृष्टीने या परिसरात महापालिकेतर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे पॅचिंग करण्यात यावे यासह मंडप उभारणी व इतर तयारीचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी २ ऑगस्टपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात विदर्भात ही यात्रा काढण्यात आली. यात्रेचा दुसरा टप्पा औरंगाबाद-नाशिक असा होता. दि.१७ ऑगस्टपासून हा दुसरा टप्पा सुरु होणार होता. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारासह अन्य ठिकाणी मोठी गंभीर पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यातील यात्रा अर्धवट सोडली होती. तसेच दुसरा टप्पाही लांबणीवर पडला होता. आता पुन्हा ही यात्रा सुरु होत असून २४ ऑगस्टला ती नगर जिल्ह्यात येणार आहे. या दिवशी शहरात यात्रेचे मोठ्या स्वरुपात स्वागत करुन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची जाहिर सभा गांधी मैदानात आयोजित करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post