उद्या शहरातून निघणार अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ग्रंथ दिंडी


माय नगर वेब टीम
अहमदनगर - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.31 ऑगस्ट रोजी सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ग्रंथ दिंडी सिध्दार्थनगर येथून काढण्यात येणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन मार्गक्रमण करीत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या दिंडीचा समारोप होणार आहे. तर यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रबोधनात्मक कार्यक्रम व सोनू साठे यांच्या गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्याख्याते, शालेय विद्यार्थी व युवक-युवती उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, कर्ज वितरण मेळावा, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे कार्यालयीन सहाय्यक राजेंद्र इंगळे, जिल्हा व्यवस्थापक एस.एल. मांजरे, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक उपायुक्त पांडुरंग वाबळे परिश्रम घेत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post