ग्रामीण भागातील पिडीत महिलांना मिळणार कायदेविषयक मार्गदर्शन



माय नगर वेब टीम
अहमदनगर - महिला व बालकांच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असलेल्या न्यायाधार संस्थेशी संलग्न बोधेगाव (ता. शेवगाव) येथे महिला सहाय्यता केंद्राचे शुभारंभ ब्रह्मकुमारी दीपा बहेनजी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.विजया काकडे उपस्थित होत्या. न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. निर्मला चौधरी यांनी आपल्या मातोश्री स्व.हौसाबाई गोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या महिला सहाय्यता केंद्राची मुहुर्तमेढ रोवली आहे. अंधश्रध्दा विरोधात लढणार्‍या व गरजू, पिडीत महिलांना मदतीचा हात देणार्‍या आईच्या अधुर्‍या लढ्याला बळ देऊन ही चळवळ पुढे चालविण्यात येत आहे.
अ‍ॅड.विजया काकडे म्हणाल्या की, समाजामध्ये कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी स्त्री-पुरुष दोघांचीही सारखीच गरज आहे. त्यासाठी स्त्रीला घरांमध्ये बरोबरीचे स्थान मिळल्यास परिवर्तन घडणार आहे. कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांचे मोठे योगदान असते. आई गेल्याचे दु:ख करण्यापेक्षा इतर पिडीत महिलांचे दु:ख दूर करण्याचे काम अ‍ॅड. चौधरी यांनी करुन प्रेरणादायी उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. ब्रह्मकुमारी दीपा बहनजी यांनी पिडीत महिलांसाठी न्यायाधार मोठा आधार ठरले असल्याचे सांगून संस्थेचे चालू असलेल्या कार्याचे कौतुक केले. अ‍ॅड.निर्मला चौधरी यांनी आई अशिक्षित असून देखील मुलींना उच्च शिक्षित केले. वडिल पोवाडे गाऊन समाजसेवा करीत तर आई शेतीकाम करुन गिरणी सांभाळत. स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार घरातूनच झाले. तर आईने अंधश्रध्देला थारा न सर्वांना मदत करण्याचे संस्कार घडविल्याने हे गुण भावी आयुष्यात उपयोगी आल्याचे आईची आठवण व्यक्त करताना त्या म्हणाल्या.
या सहाय्यता केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांना कौटुंबीक वादामध्ये समुपदेशनाची भूमिका पार पाडून कौटुंबिक वाद मिटवून त्यांच्या सुखी संसारासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. परितक्ता, पीडित, विनाआधार महिलांना शासकीय योजनेमधील कागदपत्रांसाठी मार्गदर्शन, हिंसाचार झालेल्या व पिडीत महिलेस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास मदत, शासनाच्या वैद्यकिय, आरोग्य, शिक्षण संदर्भात व पिडीत महिला व बालकांवर हिंसाचार झाल्यास कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शितल गोरे व सुजाता अभंग यांची सहाय्यता केंद्राच्या समुपदेशकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शुभांगी चौधरी, निता कांबळे, सिंधुताई जाधव, रत्नमाला जाधव, विजय जाधव, पद्मा पवार आदींसह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post