नेवासा फाटा येथे रविवारी आरोग्याचा महाकुंभ


माय नगर वेब टीम

अहमदनगर - विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या आणि महागड्या आरोग्यसेवा परवडत नसलेल्या रुग्णांसाठी आता महाआरोग्यशिबिराच्या माध्यमातून उपचार करुन घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. रविवार, दिनांक 1 सप्टेंबर रोजी नेवासा फाटा येथे हा आरोग्याचा महाकुंभ आयोजित कऱण्यात आला असून 50 हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी याठिकाणी होणार आहे. नामांकित डॉक्टरांकडून या रुग्णांवर अत्यावश्यक उपचार तसेच गरज पडली तर शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे. या महाआरोग्य शिबीराची सर्व तयारी पूर्ण झाली असून रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत हे शिबीर होणार आहे.

येत्या रविवारी नगर-औरंगाबाद रोडवर नेवासा फाटा (रिलायन्स पेट्रोलपंपाजवल) येथे हे महाआरोग्य शिबिर होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य रुग्णालय, याठिकाणी दिनांक 25 तारखेपासूनच रुग्णांची पूर्वतपासणी कऱण्यात आली असून 50 हजारांहून अधिक रुग्ण रविवारच्या शिबिरात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथील दीड हजाराहून अधिक नामांकित व तज्ज्ञडॉक्टरांकडून तपासणी करुन घेतील, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी दिली. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, महाराष्ट्र होमिओपॅथीक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जि.प. सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, तहसीलदार रुपेश सुराणा, अमोल सोनार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूयवंशी, डॉ. दिलीप पवार, गणेश चित्ते, ज्ञानेश्वर पेचे आदी उपस्थित होते. आज या सर्वांनी महाआरोग्य शिबीराच्या तयारीचा आढावा घेतला. या महाआरोग्य शिबिराशी निगडित प्रत्येक घटकांची आज बैठक घेऊन नियोजनाला अंतिम स्वरुप देण्यात आले.

महाआरोग्य शिबिरातील सर्व आरोग्यसेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक रुग्णांची पूर्वतपासणी करण्यात आली असून त्यांना संदर्भकार्ड वाटप करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या सर्व यंत्रणा, आरोग्य विभाग आदी यांत सहभागी झाल्या असून हे महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट लाभ व्हावा, यासाठी या यंत्रणा कार्यरत आहेत. महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी विविध आजारांनुसार वर्गीकरण करण्यात आले असून नावनोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णांना त्यांना आवश्यक उपचार आणि तपासणीसाठीच्या कक्षात पाठविण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची नियुक्तीही करण्यात आली असून स्वताहून पुढाकार घेत ते याठिकाणी काम करीत आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, पर्यवेक्षिका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, औषध वितरण अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी, होमगार्डस यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी यांच्याबरोबर आज चर्चा करुन रविवारी होणार्‍या या महा आरोग्य शिबिराच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर जास्तीचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याशिवाय, विविध ठिकाणी शिकाऊ डॉक्टर्स यांचा या महाआरोग्य शिबीरात सहभाग असणार आहे. त्याशिवाय, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा असे विविध जणांना या नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून पूर्वतपासणी झालेली नसेल तरीही रुग्णांना थेट नेवासा फाटा येथे आल्यानंतरही आरोग्य तपासणी आणि उपचार करुन घेता येणार आहेत.

या शिबीरात तपासणी करण्यात येणार्‍या रुग्णांसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असून विभागनिहाय त्याचे वाटप करण्यात आले आहे. शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी विविध आजारनिहाय नावनोंदणी कक्ष, 90 बाह्यरुग्ण कक्ष, औषध वाटप कक्ष आदी या ठिकाणी असणार आहेत. या तपासणीवेळी मोठे आजार असणाऱ्या रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये औषधोपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांना याठिकाणी आल्यानंतर कोणतीही अडचण न येता त्याला तपासणी व उपचार करुन घेता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने आमदार मुरकुटे यांच्या संकल्‍पनेतून मतदारसंघातील गरजू आजारी व रुग्णांना याचा लाभ व्‍हावा यासाठी या महा आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे शिबीर सर्वसमावेशक असून सर्व स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी त्या-त्या भागातील नागरिकांची नजिकच्या आरोग्य संस्थेत तपासणी करुन पुढील उपचार आवश्यक असतील तर शिबीरात पाठवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन आणि आरोग्य विभागाने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post