रोडरोमियोंचा बंदोबस्त करा ; 'या' ग्रामपंचायत व विद्यालयाची मागणी




माय नगर वेब टीम

अहमदनगर- नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमियोंचा सुळसुळाट झाला असुन त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत कार्यालय तसेच संतुकनाथ विद्यालयाच्या वतीने एम.आय.डि.सी. पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जेऊर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासुन रोडरोमियोंचा सुळसुळाट झाला असुन त्यांच्याकडुन मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

येथिल संतुकनाथ विद्यालयाशेजारी सिना नदीच्या तीरावर असलेल्या कट्ट्यावर तसेच विद्यालयाच्या परिसरात रोडरोमियोंचा वावर वाढत चालला आहे. तसेच जेऊर येथुन नगरला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थिनींना ही रोडरोमियोंचा त्रास सहन करावा लागत आहे. जेऊर बसस्थानक परिसरात विद्यार्थिनींना जाता-येता टोमने मारणे, मुलींच्या मागे पुढे धुम स्टाईल चकरा मारणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

काही रोडरोमियोंचा तर दारुच्या नशेत विद्यालय तसेच बसस्थानक परिसरात वावर असतो. अनेक विद्यार्थिंनी भितीपोटी घडलेला प्रकार घरी सांगत नाहीत. जेऊरमध्ये शिक्षणासाठी बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी, चापेवाडी, इमामपुर, आढाववाडी तसेच परिसरातील वाड्या वस्त्यांवरुन विद्यार्थी येत आहेत. काहि रस्त्यांवर वर्दळ, रहदारी नसल्याने अशा परिसरात रोडरोमियोंकडुन अनुचित प्रकार घडु शकतो. राज्यामध्ये अनेक ठिकाणी छेडछाडीला कंटाळुन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडलेले आहेत.

तरी जेऊर परिसरातील रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत कार्यालय तसेच संतुकनाथ विद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post