'परिवहन'ने सर्वसामान्यांना रोजगाराची संधी मिळवून दिली - दिवाकर रावते



माय नगर वेब टीम

अहमदनगर - प्रत्येक घर आणि कुटुंबाशी निगडीत असे परिवहन खाते आहे. या विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या. राज्यात २ लाख ६० हजार नवीन रिक्षा परवाने दिले तसेच राज्य परिवहन महामंडळात ३६ हजार नवीन भरती केली. या विभागामार्फत सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी केले.

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उदघाटन सोहळा श्री. रावते यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा, राम शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री अनिल राठोड, प्रा. शशीकांत गाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गोपीनाथ मोहिते, कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गीते यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी रावते म्हणाले, नगरमधील परिवहन विभागाचे कार्यालय गेल्या ४० वर्षापासून भाड्याच्या जागेत सुरु आहे. आता या अद्यावत कार्यालयामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता होत असल्याने शिकाऊ परवाना ऑनलाईन देण्यात येत आहे. या सुसज्ज कार्यालयामुळे येथे येणार्‍या नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात महसूल देण्यात हे खाते दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा विभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था निर्माण करणारा हा विभाग आहे. आता केंद्र शासनाने वाहतूक नियमात बदल केले आहेत. यापुढे प्रत्येक वाहनचालकाला नियम पाळावेच लागतील, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, मोडकळीस आलेल्या जागेतून आता परिवहन विभाग सुसज्ज अशा आणि शहरातील महत्वाच्या जागेवर स्थलांतरित होत आहे. माजी खासदार पद्मभूषण कै. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या प्रयत्नाने ही संरक्षण मंत्रालयाची जागा परिवहन विभागाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. परिवहन विभागामार्फत परिवहन मंत्री श्री. रावते यांनी राज्य परिवहन महामंडळालाही नवी दिशा दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात मागणी आणि गरज आहे, तेथे नवीन बसेस सुरु केल्या. तसेच जिल्ह्यासाठी लवकरच नवीन बसेस देण्याची मागणीही त्यांनी पूर्ण केली असून लवकरच त्या बसेस दाखल होतील, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. कळसकर यांनी कार्यालयाविषयी माहिती दिली. इमारत उद्धाटनापूर्वी श्री. रावते व प्रा. शिंदे यांच्या हस्ते इमारत आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश बोरा यांनी केले तर आभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी मानले.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post