याहीवर्षी शांततेने गणेशोत्सव व मोहरम साजरा करण्याचा नगर पॅटर्न कायम राहील



माय नगर वेब टीम

अहमदनगर - मागीलवर्षी प्रमाणेच याही वर्षी एकत्रित येणारा गणेशोत्सव आणि मोहरम सण शहरवासीय आणि जिल्हावासीय आनंदात, उत्साहात आणि कोणतेही गालबोट लागणार नाही, असाच साजरा करतील आणि राज्यासमोर शांततापूर्ण उत्सव साजरा करण्याचा नगर पॅटर्न ठेवतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. यावेळी विविध गणेश मंडळे व मोहरम उत्सव समित्यांनी आरास साधेपणाने करुन काटकसर करुन कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देणार असल्याचे यावेळी सांगितले.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज आगामी गणेशोत्सव, मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सहायक परिवहन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. विविध गणेश मंडळे, मोहरम उत्सव समित्यांचे अध्यक्ष-पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य यांची यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


जिल्ह्यधिकरी द्विवेदी म्हणाले, प्रत्येक सणाचे, उत्सवाचे एक वैशिष्ट्य असते. प्रत्येक सण हा काहीतरी चांगला व सकारात्मक संदेश देऊन जातो. त्यामुळे एकोप्याची, एकात्मतेची आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे हे सण एकत्रित येत आहेत. ते चांगल्या प्रकारे साजरे करुन सकारात्मक संदेश सर्वांपर्यंत जाईल, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विविध मंडळांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणींवर जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका निश्चितपणे विचार करेल. त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होणे, आपल्या शहराचे वातावरण अधिक चांगले राहील, यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात. मागीलवर्षी सर्व गणेशमंडळे आणि मोहरम उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी ते दाखवून दिले आहे. तीच चांगली व सकारात्मक परंपरा यावर्षीही सुरु राहील, याचा विश्वास वाटतो, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक सिंधू यांनी, मागील वर्षी शांततापूर्ण वातावरणात साजर्‍या झालेल्या उत्सवांचं सगळं श्रेय हे विविध मंडळे आणि कार्यकर्त्यांचं असल्याचं सांगितलं. हेच चांगले वातावरण यावर्षीही कायम ठेवू. त्यात अडचणी निर्माण करणार्‍यांवर कडक कार्यवाही केली जाईल. याकामी चांगल्या लोकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळे, मोहरम उत्सव समित्यांचे कार्यकर्ते यांच्या सहभागातून सर्वधर्मसमभाव रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.


आयुक्त भालसिंग यांनी गणेश मंडळांना विविध परवानग्या तातडीने दिल्या जात असल्याचे सांगितले. गणेशोत्सवापर्यंत विविध रस्ते, त्या मार्गावरील वीज, मोकाट जनावरे आदींबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

यावेळी शांतता समितीचे सदस्य तसेच विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उत्सवादरम्यान शहरातील अवजड वाहतूक बंद करावी, रस्त्यांवरील खड्डे बुडवावेत, डीजेबंदी कायम ठेवावी, विनापरवाना फ्लेक्सवर कारवाई करावी, वर्गणीच्या नावे सक्ती करणार्‍यांवर कारवाई करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अधिकाधिक युवा वर्गाचे स्वयंसेवक म्हणून पोलीसांनी सहकार्य घ्यावे, असे मुद्दे मांडले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post