नगरमधील एसटी बसस्थानक आता कात टाकणार




स्वच्छता रक्षक समिती व आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहर स्वच्छता उपक्रमास प्रारंभ

माय नगर वेब टीम

अहमदनगर- शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांनी एकत्र येवुन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्या वतीने आणि आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहरात मंगळवार(दि.२७) पासून शहर स्वच्छता उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील तीनही बसस्थानकात प्रारंभी हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यामुळे या बसस्थानकांचे रूप लवकरच पालटणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर असलेल्या जुने बसस्थानक, स्वास्तिक बसस्थानक, तारकपूर बसस्थानक या ठिकाणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका शितल जगताप, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, स्वच्छता रक्षक समितीच्या डॉ. आश्लेषा भांडारकर, ज्योती दिपक, प्रतिभा धुत, सुधा खंडेलवाल, शशी भिंगारवाला, श्रद्धा बिहाणी, अनुपमा गाडेकर, माधवी दांगट, मंजू धूत, राजकमल मनियार, स्नेहलता सोमाणी, विवेक हेगडे, मधुर बागायत, मलीत एलिशा, गीता गिल्डा, शितल मंत्री, सोनल सोमाणी आदी उपस्थित होत्या.

यावेळी एसटी विभाग नियंत्रक विजय गिते यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत बसस्थानकांचे रूप पालटण्यासाठी योगदान दिले.दिवसभरात मोठ्या प्रमाणावर कचरा, मातीचे ढीग, दगड गोटे उचलण्यात येवून बस स्थानकांची स्वच्छता करण्यात आली.यावेळी एसटी विभाग नियंत्रक विजय गिते यांनी बसस्थानक परिसरात दररोज स्वच्छता करून साचलेला कचरा महापालिकेमार्फत नियमित उचलून नेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. शहर स्वच्छता उपक्रमात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी जागोजागी जनजागृती फलक लावण्यात येणार असून, रंगरंगोटी करुन घोषवाक्य लिहिण्यात येणार आहेत, आवश्यक त्या ठिकाणी वृक्षारोपण करून त्याठिकाणी बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात येणार आहेत.

आपले नगर शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी स्वच्छता रक्षक समितीने सुरु केलेल्या या उपक्रमात प्रारंभी तीनही बसस्थानकांचे रूप पालटल्या नंतर शहरातील मुख्य रस्ते, रहदारीची ठिकाणे, विविध भागातील कॉलन्या यामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहर स्वच्छता उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी स्वच्छता रक्षक समितीच्या वतीने करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post