शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी 27ऑगस्टपासून 'हा' उपक्रम; आ.जगताप होणार सहभागी


माय नगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांनी एकत्र येवुन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्यावतीने येत्या २७ ऑगस्टपासून शहर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमास शहरातील नागरिकांसह महापालिका प्रशासनाचे सहकार्य घेतले जाणार आहे. नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर असलेल्या जुने बसस्थानक, स्वास्तिक बसस्थानक, तारकपूर बसस्थानक व बालिकाश्रम रस्ता याठिकाणावरुन होणार आहे. या पार्श्वभुमीवर स्वच्छता रक्षक समितीच्या सदस्यांनी बुधवारी (दि. २१) दुपारपर्यंत या चारही परिसरांची पाहणी करुन कशा पद्धतीने ती मोहिम राबविता येईल याबाबत चर्चा केली. यावेळी समितीच्या ज्योती दिपक, किरण कालरा, प्रतिभा धुत, सुधा खंडेलवाल, शशी बिहाणी, अनु गाडेकर, माधवी दांगट आदी उपस्थित होत्या.उ स्वच्छता रक्षक समितीच्या या उपक्रमात आ.संग्राम जगताप हेही सहभागी होणार असून त्यांनीही समितीसमवेत याठिकाणांची पाहणी केली. जुन्या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. याठिकाणी कशा पद्धतीने काम करायचे व हा परिसर यापुढे कायमस्वरुपी स्वच्छ कसा राहिल याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी एसटीचे विभागनियंत्रक विजय गिते, अभियंता कैलास काळभोर, अभियंता लक्ष्मण पाटोळे, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ.एन.एस.पैठणकर, स्वच्छता निरीक्षक आर.सी.रामदिन, आर.एल.सारसर, के.के.देशमुख, टी.एन.भांगरे तसेच माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आदी उपस्थित होते.

कचरा उचलला जात नसल्याची तक्रार
यावेळी एसटी विभाग नियंत्रक विजय गिते यांनी बसस्थानक परिसरात दररोज स्वच्छता केली जाते मात्र साचलेला कचरा महापालिका नियमित उचलून नेत नाही त्यामुळे हा कचरा पुन्हा पसरून अस्वच्छता निर्माण होत असल्याची तक्रार केली. त्यावर आ.जगताप यांनी तीनही बसस्थानकात दररोज नियमितपणे कचरा गाड्या पाठवून तो कचरा उचलावा अशा सुचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. शहर स्वच्छता उपक्रमात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी जागोजागी जनजागृती फलक लावण्यात यावेत, रंगरंगोटी करुन घोषवाक्य लिहिण्यात यावीत, आवश्यक त्या ठिकाणी वृक्षारोपण करावे अशा सुचनाही आ.जगताप यांनी दिल्या. आपले नगर शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी स्वच्छता रक्षक समितीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्यावतीने येत्या २७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या शहर स्वच्छता उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी आ.संग्राम जगताप यांनी केले. शहरातील मुख्य रस्ते, रहदारीची ठिकाणे, विविध भागातील कॉलन्या यामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post