गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीचा धुराडा!



माय नगर वेब टीम

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना दक्षिण महाराष्ट्रात महापुरामुळे ब्रेक लागला होता. मात्र, आता तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या प्रशासकीय कामांना गती आली आहे. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याची चिन्हे असून त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी 31 तारखेला प्रसिध्द करण्यात येणार असून शनिवारी यादीवर निर्णय घेण्याचा अंतिम दिवस होता.

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी जुलैमध्ये राजकीय हालचालींना गती आली होती. सर्वच राजकीय पक्षांकडून युती, आघाडी करण्याच्या प्रक्रियेबरोबरच उमेदवार निश्चितीसाठी मुलाखतीही पार पडल्या. पण ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात दक्षिण महाराष्ट्रासह पुणे, नाशिक आणि अन्य ठिकाणी महापुराने थैमान घातले. यामुळे राज्यभरातील राजकीय धुळवड थंडावली. आता पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थांबलेले पक्षप्रवेश सुरू झाले असून, राजकीय पक्षाच्या संपर्कयात्राही सुरू झाल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यालयांना प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामाला गती आली आहे. दक्षिण महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागातील मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे. सर्वच जिल्ह्यांतील निवडणूक कार्यालयातील कामाची ही गती पाहता 13 किंवा 14 सप्टेंबरला निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याचे संकेत आहेत. अनंत चतुर्दशी 12 सप्टेंबरला आहे. ती होताच निवडणुकीचा बिगुल वाजेल. साधारणपणे 15 ऑक्टोबरला राज्यात एकाचवेळी मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये फक्त एक किंवा दोन दिवसाचा बदल होईल. त्यानंतर चार दिवसांतच मतमोजणी होईल. दिवाळी 25 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. निवडणुकीचा निकाल आणि दिवाळी यात आठ दिवसाचा कालावधी राहणार आहे. साहजिकच मंत्रिमंडळ यादी तयार करण्यास कमी वेळ मिळणार आहे. यामुळे नवीन मंत्रिमंडळ दिवाळीनंतरच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातील मतदरांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी प्रारूप यादीवर दाखल हरकती आणि बदल याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार यादी अंतिम करून तिची छपाई करून 31 तारखेला संबंधीत अंतिम यादी प्रसिध्द करण्यास जिल्हा निवडणूक विभाग सज्ज होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post