विखेंच्या सोयीसाठी नेवासा मतदारसंघावर 'गदा'



माय नगर वेब टीम

अहमदनगर-

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपात नेवाशाची जागा शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी राहत्याची जागा भाजपला सोडण्याच्या बदल्यात नेवासा शिवसेनेला देण्याची तडजोड वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे समजते.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्ह्यात युतीत नव्याने जागा वाटप होणार असल्याचे सूचक वक्तव्य केलेले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात नेवाशाची जागा फार पूर्वीपासून भाजपच्या वाट्याला आहे. बऱ्याच पंचवार्षिक तालुक्यातील गडाख-घुले या दिग्गजांशी अयशस्वी झुंज दिल्यानंतर 2014च्या निवडणुकीत भाजपने येथे बाजी मारली आहे. 2019च्या निवडणुकीची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा रंगली असून यावेळी येथे कोण आमदार होणार याची उत्सुकता लागली आहे. विद्यमान भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याबद्दल युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उघड नाराजी असल्याचे दिसून आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी मिळू नये, यासाठी युतीचे निष्ठावान कार्यकर्ते ‘प्रयत्नशील’ असल्याचे दिसून आले आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास ‘काम न करण्याचा’ गर्भित इशारा या कार्यकर्त्यांनी दिला असून त्यामुळे युतीच्या वरिष्ठांची डोकेदुखी वाढल्याचीही चर्चा ऐकावयास मिळते. आमदार मुरकुटे यांच्या ऐवजी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विस्थापित झालेले माजी खासदार दिलीप गांधी यांचे नाव युतीच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे केल्याने आगामी उमेदवारीबाबतच्या अनिश्चीततेत मोठी भर पडल्याचे दिसून येते.

त्यातच माजी आमदार शंकरराव गडाखांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या वावड्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
मुलाच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेस-राष्ट्रवादीमधून खोडा घातला जात असल्याचे लक्षात येताच विरोधीपक्ष नेतेपद डावावर लावून भाजप मधून निवडून आणलेल्या राधाकृष्ण विखेंची युतीशी गाठ पक्की झाली आहे. विखे भाजपात गेल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा राहता विधानसभा मतदारसंघात तांत्रिक अडचण उभी राहिल्याचे बोलले जाते.

युतीच्या जागावाटपात राहत्याची जागा शिवसेनेला असल्याने विखेंना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने चाचपणी करता जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नेवाशाची जागा भाजपसाठी कमकुवत असल्याचे केवळ कार्यकर्त्यांचेच म्हणणे नव्हे तर एक्झिट पोलचाही रिपोर्ट लक्षात घेतला गेला असल्याची चर्चा ऐकावयास मिळते.

या सर्व पार्श्वभूमीवर युतीच्या जागावाटपात राहत्याची जागा विखेंसाठी भाजपला घ्यायची व त्याबदल्यात नेवाशाची जागा सेनेला सोडायची, अशी धूर्त खेळी खेळली जात असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे जागावाटपातील या बदलास तालुक्यातील भाजपच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनीही संमती दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युतीचे जागावाटप ही केवळ औपचारिकता बाकी असल्याचा दावा केला जात असून त्याप्रमाणे झाल्यास शिवसेनेची तालुक्यातून उमेदवारी कोणाला राहील याची उत्सुकता वाढीस लागली आहे.

जिल्ह्यात 8-4 चा फॉर्म्युला
नगर जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आहेत तर शिवससेनेचा एकच आमदार आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नगर-राहुरी, कोपरगाव, राहाता, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी, अकोले, श्रीगोंदा या मतदारसंघासह एका मतदारसंघावर भाजपाचा पक्का दावा आहे. विधानसभेसाठी जिल्ह्यात 8 - 4 चा फॉर्म्युला ठरू शकतो असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post