निवडणुकांच्या राजकारणामुळे गावे उध्वस्त होण्याच्या मार्गावर


पोपटराव पवार यांचे मत; वॉटर कप पारितोषिक विजेत्यांचा सोनेवाडीत सत्कार

माय नगर वेब टीम

अहमदनगर - आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे राजकारण हे ओघाने येतच असते. राजकारण केवळ निवडणुकांपुरते ठेवले पाहिजे. परंतु सध्या प्रत्येक गोष्टीत राजकारण येवू लागल्याने गावे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून गावाचे गावपण जपण्यासाठी आता जलसंधारणा सोबतच गावातील गावकऱ्यांचे मनसंधारण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत नगर तालुक्यात पारितोषिक मिळालेल्या सोनेवाडी, जांब, सारोळा कासार या गावातील जलमित्रांसह तालुक्यात या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील जलमित्रांचा सत्कार सोनेवाडी (ता.नगर) गावच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोपटराव पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रभान आमले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके, सरपंच स्वातीताई सुंबे, उपसरपंच नितीन दळवी, गावचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव दळवी पाटील, बाळासाहेब दळवी, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, तालुका समन्वयक दिलीप कातोरे, सुधीर मांडगे, वाल्मिक शिंदे, नितीन साठे, प्रदिप वायभासे आदी उपस्थित होते.

प्रारंभी तालुक्यातून आलेल्या सर्व जलमित्रांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या जलमित्रांच्या स्वागतासाठी संपुर्ण गाव उपस्थित होता.

यावेळी बोलताना पोपटराव पवार पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी 'खेड्याकडे चला...' हा मंत्र दिला होता. त्यामागे त्यांचा उद्देश गावात पिण्याचे चांगले पाणी, शेतीचे पाणी, चांगले रस्ते, वीज, आरोग्य, गुणवत्तादायी शिक्षण आणि सामाजिक सद्भावनेचे वातावरण असावे असा होता. स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्षे झाली तरी अजुनही या मुलभूत सुविधा गावागावात निर्माण होऊ शकलेल्या नाहीत. निवडणुकांच्या राजकारणाने गावे विस्कळीत होत आहेत. यापुढे जर गावाचे गावपण टिकवण्यासाठी जलसंधारण आणि त्यासोबतच मनसंधारण होण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले नाहीत तर भविष्यातील परिस्थिती अतिशय भयानक असेल. हे ओळखुनच अभिनेते अमिर खान यांनी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा सुरू केलेली आहे. यात अनेक गावे पुढे येत आहेत आणि जलसमृद्ध होत आहेत.

संपुर्ण देशासमोर आणि जगासमोर आज पाण्याच्या समस्येने उग्र रुप धारण केलेले आहे. त्यामुळे पाण्याचा ताळेबंद आणि पिक नियोजन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अंगणवाडी ते पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात पाण्याचा ताळेबंद विषय सक्तीचा करणे आवश्यक आहे, आता केवळ साक्षर होऊन जमणार नाही तर जलसाक्षर होणे ही काळाची गरज झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सुंबे यांनी केले. ज्ञानदेव दळवी यांनी वॉटर कप स्पर्धेच्या कालावधीतील घटनांचा आढावा घेतला. तालुक्यातून आलेल्या विविध जलमित्रांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप हरिश्चंद्र दळवी व विकास गोबरे यांनी केले. तर विठ्ठलराव दळवी यांनी आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post