कसं होणार युतीचं ?




निलेश आगरकर @ माय नगर वेब

आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रच लढवतील. त्या शिवाय त्यांना पर्याय नाही. पुन्हा सत्तेत यायचे असेल तर युती टिकवावीच लागेल. पण अलीकडे ‘मुख्यमंत्री कोणाचा?’ ह्यावरून सुरु कलगीतुरा युतीप्रेमींसाठी काळजीचा विषय होत चालला आहे. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे सेनेचे काही नेते छातीठोकपणे सांगतात तर ‘पुढचा मुख्यमंत्री मीच राहील’ असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात जाहीर केले. सर्व २८८ जागांवर तयारी करण्याचा सूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावल्याने युतीचे काय होणार ह्या चर्चेला उधाण आले आहे. खरेच काय होणार युतीचे?

काहीही होणार नाही. निवडणुकीच्या निकालापर्यंत ‘मुख्यमंत्री कोणाचा ? ’ची जुगलबंदी चालू राहील. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस ह्या तिघांमध्ये युतीचा करार झाला. काय ठरलं? ते ह्या तिघांनाच माहित आहे. पक्षामध्ये ते बोलत नाहीत. ‘आमचं ठरलंय’ एवढेच मीडियाला सांगतात. त्यामुळे सारा सस्पेन्स आहे. पारदर्शिता हवी असेल तर त्यांनी युतीचा करार जाहीर करून टाकावा. पण ते करणार नाहीत, कदाचित ती त्यांची रणनीती असेल. अखेरपर्यंत संभ्रम टिकवून ठेवून कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ ठेवायचे असा डावपेच असेल. ‘आपला मुख्यमंत्री’ बसवण्यासाठी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते दुप्पट जिद्दीने कामाला भिडलेले दिसत आहेत ते त्याच रणनीतीतून. ज्याचे आमदार जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री हे राजकारणातले अलिखित सूत्र असते. आताही त्याच प्रमाणे होणार आहे. कुस्ती मारायची असेल तर शिवसेनेला जागावाटपात चलाखी दाखवावी लागेल. आमदार जास्त निवडून आणण्यासाठी जास्त जागा लढवणे आवश्यक आहे. निम्म्या जागा आणि मित्र पक्षांना ‘कमळा’वर लढवून भाजप मैदान मारणार आहे. त्यामुळे कुणी कितीही पटकले तरी पुढचा मुख्यमंत्री भाजपचा आणि फडणवीसच असणार आहेत. फडणवीस यावेळी अतिशय आक्रमक आहेत. बाहेरच्या ५-२५ आमदारांना तिकिटे देऊन ते ‘अब की बार, २२० पार’ करतील.

उद्धव ठाकरे यांनाही हे कळते. मौन राखून ते ह्या कलगीतुऱ्यातील ‘खुन्नस’ टिकवू पाहत आहेत. एक सांगू का? या वेळच्या निवडणुकीत आव्हानच नाही. दोन काँग्रेसच्या आघाडीत कमालीची मरगळ आहे. निवडणूक लढवायची म्हणून ते लढत आहेत. बाकी त्यांच्यात त्राण नाही. निवडणूक जिंकायला नेता लागतो, सैन्य लागते, पैसे लागतो. यातली कुठलीही गोष्ट दोन्हीही काँग्रेसकडे आज नाही. राहुल गांधी पळाल्यानंतर काँग्रेस कोमात गेली आहे. बाळासाहेब थोरात यांना मर्यादा आहेत. राष्ट्रवादी आता पूर्वीची राहिली नाही. पूर्वी राष्ट्रवादीचे नेते अंगावर यायचे. आता शरद पवार उसने अवसान आणत असले तरी थकले आहेत. आपला नेता आपल्याला जिंकवून देऊ शकत नाही हे लक्षात आल्याने पळापळ सुरु झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post