भाजपा स्वबळाच्या तयारीत! ; मंगळवारी 12 ही मतदारसंघाच्या मुलाखती


माय नगर वेब टीम 
अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने स्वबळाची चाचपणी सुरु केली आहे. नगर शहरासह पारनेर मतदारसंघातही इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांची शिवसेना, भाजपात जाण्याची चर्चा समाज माध्यमात जोरदार सुरु आहे. ते या मुलाखतीला जातात का? हे पाहणे महत्वाचे आहे. मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता हॉटेल व्ही. स्टार, तारकपूर स्टॅण्ड जवळ, अहमदनगर येथे भाजपाचे सरचिटणीस आ. रामदास आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत, असे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शामराव पिंपळे यांनी काढले आहे. 

विधानसभेचा आखाडा गाजू लागला असून त्यादृष्टीने सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. एक बार फार भाजपा सरकार असा नारा देत भाजपाने मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन केले असून मुलाखतीच्या दिवशी इच्छुकांकडून शक्तीप्रदर्शनासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
मंगळवारी मुलाखतीच्या दिवशी सुरवातीला नेवासा मतदारसंघाच्या मुलाखती होणार असून मुलाखती दुपारी एक वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर अकोले, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, कर्जत- जामखेड, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नगर शहर अशा मुलाखती होणार आहेत. इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहत एकट्यानेच मुलाखत द्यायची आहे. तसेच या दिवशी कोणतेही शक्ती प्रदर्शन करु नये असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केले आहे. 

राज्यपातळीवर भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याचे सांगितले जात असले तरी भाजपने सर्व 288 जागांवर बुथप्रमुखांचे मेळावे व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गतच नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांतील बुथप्रमुखांचे मेळावे व नंतर तेथील इच्छुकांच्या मुलाखतींचे नियोजन आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post