' त्याचा ' नाद सोडा, आणि कामाला लागा; सोनिया गांधींनी नेत्यांना खडसावले





 माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे बसलेल्या मोठ्या धक्क्यामुळे चिंतेत असलेले काँग्रेसचे नेते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचितने सोबत यावे, यासाठी मोठे प्रयत्न केले. कॉंग्रेसच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी प्रकाश आंबडेकरांचे मनपरिवर्तन करण्यासाठी आंबेडकरांच्या घरी चकरा मारल्या. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी नेत्यांनी चालविलेल्या मिन्नतवाऱ्यांमुळे संतप्त झालेल्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी, “आंबेडकरांचा नाद सोडा, त्यांच्यावर अवलंबून न राहता कामाला लागा,” अशा शब्दांत नेत्यांना खडसावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर राज्यपातळीवरील काही नेत्यांनी तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींसमोर झालेल्या आढावा बैठकीत या पराभवाला प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी जबाबदार असल्याचे सांगितले होते. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी बघता लोकसभेच्या सुमारे डझनभर जागा केवळ ‘वंचित’च्या उमेदवारांमुळेच गमवाव्या लागल्याचे रडगाणेही या नेत्यांनी गायले होते.

त्यावर, “वंचित’वर खापर फोडण्याऐवजी कॉंग्रेसला जनतेने का स्वीकारले नाही? याचा विचार करा, असे राहुल गांधींनी फटकारले होते. तसेच अशा संभाव्य आघाडीची शक्‍यताही फेटाळून लावली होती. दुसरीकडे, सोनिया गांधींनी कॉंग्रेसमधीलच दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांना पुढे आणण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

‘वंचित आघाडी’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या जागावाटपाच्या अवाजवी मागण्या आणि कॉंग्रेसला तुच्छ लेखण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते, नेत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आंबेडकरांनी आघाडीसाठी निम्म्या म्हणजे १४४ जागांची मागणी करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसशी मैत्री तोडण्याची पूर्वअटही घातली होती. अर्थातच, कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतची आघाडी संपुष्टात आणण्याची कोणतीही पूर्वअट धुडकावून लावली. त्यानंतरही प्रदेशस्तरावरील नेत्यांनी ‘वंचित’शी हातमिळवणीचा चालविलेला प्रयत्न आणि प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसला दिलेली हेटाळणीची वागणूक याबाबत सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नेत्यांकडून तक्रारी आल्यानंतर केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना या बोटचेपेपणाबद्दल कानउघाडणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, काही प्रदेश नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर राज्यातील सध्याची परिस्थिती सांगताना अल्पसंख्याक समाजाला कमीत कमी वीस जागा द्याव्यात; तर दलित, मागासवर्गीयांना त्यांच्या राखीव जागा वगळून आणखी अतिरिक्त जागा द्याव्यात, अशी सूचना केली आहे. या व्यूहरचनेतून प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव कमी करता येईल, असा प्रस्ताव दिल्याचे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post