शिंदे साहेब, तेवढं कुकडीच्या पाण्याचं तुम्हीच बघा





माय नगर वेब टीम

श्रीगोंदा – कुकडीच्या लाभ क्षेत्रात शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी केली; मात्र ऑगस्ट महिना व अख्खा श्रावण कोरडा गेल्याने आभाळाकडे लागलेल्या बळीराजाच्या नजरा कुकडीच्या चालू आवर्तना कडे लागल्या. मात्र 25 दिवसांनंतर ही कुकडीच पाणी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाले नाही.ज्यांची जबाबदारी होती ते कुकडीच्या कार्यकारी अभियंता यांनी मौन बाळगले असल्याने अणि तालुक्यातील आजी, माजी आमदारांचे पाणी सोडण्यासाठी वजन पडणार नसेल तर तालुक्यातील शेतकरी आता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कर्जत-जामखेडचे आमदार ना. प्रा. राम शिंदे आता तरी आमच्या पाण्याचं बघा म्हणत आहेत. निदान आलेच पाणी वेळेवर तर किमान फळबागा तरी वाचतील या आशेने शेतकरी पाण्याची वाट पाहत आहेत.


मागील वर्षीचा दुष्काळ अणि पाण्याची टंचाई बघता यंदा जुलैमध्ये पडलेल्या जेमतेम पावसावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप मका, बाजरी, तूर, सोयाबीन, उडीद, कपाशी लागवड केली. तर लिंबू श, द्राक्षश, डाळिंब बागा अजून टँकर च्या पाण्यावर जगवल्या. जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडला; पण नंतर पाऊस आला नाही. खरिपाची पिके आणी फळबागा जगवण्याचा भरोसा कुकडीच्या आवर्तनावर होता; मात्र पाणी देण्याचा निर्णय अजून झाला नाही. आता पिके जळल्यावर पाणी आले तर त्याचा उपयोग काय होणार असा प्रश्न पडला आहे. पाऊसही नाही आणि कुकडीच्या लाभक्षेत्रात आवर्तन ही नाही त्यातच पिकावर आलेली रोगराई या दुष्टचक्रात शेतकरी मेटाकुटीला आला आहे .
निसर्गाच्या दृष्टचक्रात सतत पिचणारा बळीराजा यंदाही हवालदिल झाला आहे.

खरिपाची पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. उष्णतेत वाढ झाली. यामुळे अंकूरलेले बियाणे हात दीड हात आल्यावर करपले. विहिरी बोअरवेलमधील पाणी पूर्वीच आटले असल्याने उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. अस्मानी संकटात शेतकर्‍यांना पावसाची शक्यता दिसत नसल्याने कोरड्या दुष्काळाची छाया गडद झाली असताना कुकडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले आहे. या पाण्याचे राजकारण न करता आहे त्या फळबागा वाचवण्यासाठी पाणी तातडीने सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच मका, बाजरी, मूग पिके आता उन्हाच्या तडाख्यात जगतील का पाण्यावाचून जळतील अशी परिस्थिती आहे. पुरेसा पाऊस नाही त्यात पंधरा दिवसापासून पाऊस गायब झाला आहे.


निसर्गाचे दुष्टचक शेतकर्‍यांच्या पाचविला पूजलेले आहे. दरवर्षी या ना त्या कारणाने नापिकीचा सामना तालुक्यातील शेतकर्‍यांना करावा लागला आहे. कुकडी धरणातील पाण्याचे मागील अनेक वर्षापासून योग्य नियोजन होत नसल्याने ऊस, फळबागा जळाल्या. पाण्यासाठी आंदोलने करणारे पुढारी दमले. त्यातच आंदोलन करणारे पुढारी बदलले. सत्तेत आल्याने तर आंदोलक बदलले; परंतु तालुक्यातील पाण्याचे प्रश्न तेच राहिले असल्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करणारे शेतकर्‍यांना कर्जाचे हप्ते फेडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून कुकडीच्या पाण्याचा संघर्ष नित्याचीच बाब झाली आहे. राजकीय नेते पाण्यासाठी आंदोलने करत होती; मात्र यंदा एकही राजकीय आंदोलन पाण्यासाठी झाले नाही. आजी, माजी आमदारांनी पाण्याबाबत जोरदार भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. कुणाच्या काळात तालुक्याचे वाळवंट झाले हे सांगण्यासाठी स्पर्धा लागणार असली तरी तालुक्यातील पिके मात्र पाण्यावाचून सुकत आहेत .





0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post