राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश







माय नगर वेब टीम

मुंबई - राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्देश देत पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे.
अनेक नेत्यांचा सहभाग असून यामध्ये मधुकर चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आनंदराव अडसूळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षाच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात या बँकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता या सर्वांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधी देखील अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आले असून त्या प्रकरणात देखील त्यांच्यावर अटकेची तलवार असून या प्रकरणात हायकोर्टाच्या या आदेशाने त्यांच्या अडचणींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अशा प्रकारे झाला राज्य सहकारी बँक घोटाळा

१) बँकेच्या संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन करून कर्जपुरवठा केला
२) त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करून नऊ साखर कारखान्यांना 331 कोटींचे कर्ज दिले
३) अनेक साखर कारखान्यांकडे २२५ कोटी रुपयांचे थकीत कर्ज
४) लघुउदयॊजकांना दिलेल्या कर्जामुळे बँकेचे ३ कोटींचे नुकसान
५) अनेक सूतगिरण्यांना जवळपास ६० कोटी रुपयांचे कर्ज
६) कर्जवसुलीमध्ये मालमत्ता विक्री करून देखील जवळपास ५०० कोटी रुपयांचे बँकेचे नुकसान
७) केन अॅग्रो इंडियामुळे १९ कोटींचा तोटा

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post