महाराष्ट्रातल्या राजकारणातील मोठी बातमी; राणे या तारखेला करणार भाजपमध्ये प्रवेश!





मुंबई - सत्ताधारी भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंग नेत्यामधील सर्वात मोठे नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे होय. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या प्रवेशाबाबत त्यांनी अखेर खुलासा केला आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनाला राणे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली. येत्या 1 सप्टेंबरला मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

उपोषणाला बसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांना पत्रकारांनी भाजप प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारला. तेव्हा एक सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. मुळचे शिवसैनिक असलेले राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वत:चा पक्ष काढला होता. सध्या ते भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी राणे यांनी भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्याचे सांगितले होते. याबाबत आपण नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याकडून प्रवेशासाठीचा हिरवा कंदील मिळाला आहे. आता मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हेच प्रवेशासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील असे राणे म्हणाले होते.
निवडणुकीच्या तोंडावर नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार हादरे बसत आहेत. नेत्यांचं पक्ष बदलण्याचं प्रमाण एवढं वाढलं की आता त्याला मेगाभरती असं नावही पडलं. या मेगाभरतीचा आणखी एक टप्पा पुढच्या आठवड्यात होणार असून त्याचा मुहूर्तही ठरला आहे. 1 सप्टेंबरला सोलापूरात आणि 5 सप्टेंबरला मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले 5 दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सगळे बडे नेते असल्यानं त्यासाठी खुद्द भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा हे राज्यात येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा हादरा बसणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post