पक्षातून जे गेले त्यांच्याबद्दल विचार करण्याची गरज नाही; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा टोला



माय नगर वेब टीम
श्रीरामपूर -पक्षातून  जे गेले त्यांच्याबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलातील विविध इमारतीचे उद्घाटन व नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विधानसभेत असताना पक्षातून एका वेळी 60 लोकांपैकी 52 लोक मला सोडून गेले होते. परंतू तरीही मी पुन्हा उभा राहिलो. लोकशाहीत कुणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे जे गेले त्याबद्दल आता विचार करण्याची गरज नाही.

राज्यात वाढलेली बेरोजगारी, देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट, शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न दारिद्रय या मुलभूत प्रश्‍नांना बगल देवून जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून सुरु आहे, मात्र यावेळी जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितले. देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी निर्माण होत आहे.

अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कमी करण्याचे सत्र सुरु केले आहे. परंतू सत्ताधारी सांगतात की, परिस्थिती चांगली आहे. परंतू बँकींग क्षेत्रातून काही लाख कोटी बाजूला काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार नोकर्‍या पाठोपाठ उद्योगही बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. ही स्थिती भयावह आहे. आर्थिक मंदी संदर्भात वेळ

पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे श्री. पवार म्हणाले. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत विचारले असता पवार म्हणाले 120 राष्ट्रवादी, 120 काँग्रेस व 48 मित्रपक्ष या फॉर्मुल्यावर आमची चर्चा सुरु आहे. जनतेच्या प्रश्‍नावर लढा देण्यासाठी सर्वांना बरोबर घेवून जाणार असल्याचे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post