नगरमध्ये घुमतोय 'जय श्रीराम'चा नारा अन् कळमकरांचा 'अभिषेक'




नीलेश आगरकर @ माय नगर वेब
            नुकतीच नगर शहरातील दहिहंडी मोठ्या उत्साहात पार पडली. पण, या दहिहंडीच्या निमित्ताने राजकीय 'दहिहंडी' ही शिजली. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानची दहीहंडी माळीवाडा बसस्थानक चौकात, तर राष्ट्रवादीचेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठानची दहीहंडी सावेडीत फुटली. शहराचा एकच वादा.... अभिषेक दादा आणि जय श्रीराम... जय भवानी . . . हे दोन नारे या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात नगरकरांना ऐकायला मिळाले. आ.जगतापांच्या दहिहंडीतील जय श्रीरामचा नारा चर्चेचा विषय बनला. तर शहराच्या आमदारकीसाठी माजी महापौर अभिषेक कळमकरांनीही मैदानाची आखणी सुरु केलीय. त्यातच भाजपाच्या यंत्रणेनेची  नगर शहरात चाचपणी सुरु असून माजी खासदार दिलीप गांधींच्या नावाने पाथर्डीत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश मागितला.
        राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगतापही भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा समाजमाध्यमात सुरू आहे. येणार्‍या विधानसभेच्या अनुषंगाने बरीच उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.




शहराचे २५ वर्षे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा पराभव करून आमदार झालेले संग्राम जगताप यांनी गेल्या पाच वर्षांत शहरातील पक्षाचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी कबर कसली आहे.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात १९८५ मध्ये आमदार झालेल्या दादांनी पुतण्या अभिषेककडे आपला राजकीय वारसा सोपवीला. क्रिकेट क्षेत्राची आवड असणाऱ्या अभिषेकला अनपेक्षितपणे 2013 च्या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात लाँच केले. पहिल्याच प्रयत्नात ते महापौर झाले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीपासून अभिषेकला अलिप्त ठेवून दादांनी थेट त्याच्या आदारकीसाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु मागील काही महिन्यापासून आमदार संग्राम जगताप यांच्या पक्ष बदलाची चर्चा समाज माध्यमात जोरदार सुरू झाल्यामुळे  अभिषेकने पुन्हा नगर शहर मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले. जगताप यांनी पक्ष सोडला, तर राष्ट्रवादीवादीकडून उमेदवारीसाठी आपला ’अभिषेक’ होणार याची कुणकुण त्यांना लागली आहे.


              महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने जगताप पिता-पुत्राच्या विरोधात दादांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पण काही दिवसांतच त्यांच्यात पुन्हा दिलजमाई झाली. मात्र ही दिलजमाई वरवरचीच असल्याचे वेळोवेळी दिसून आले. संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ  टाकण्यासाठी योगदान देणारे दादाच व पुतणे अभिषेक पुन्ह दंड थोपटण्यास तयार असल्याचे चित्र श्रीयोगच्या दहीहंडीत दिसून आले.

        नगर शहराचा एकच वादा..... अभिषेक दादा’ अशी डरकाळीच कळमकराच्या समर्थकांनी फोडली. संग्राम जगताप यांनी देखील माळीवाडा बसस्थानक चौकात प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला. काही दिवसांपूर्वी मी पक्षातच आहे, पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे बोलणारे संग्राम जगताप यांच्या  दहीहंडीत उत्सवात काही
 समर्थकांनी थेट माईकवरून जय श्रीराम...चा नारा दिला. शिवसेना की भाजप याची चाचपणी सुरू असल्याचे जगताप यांच्या समर्थकांच्या बदलेल्या घोषणतून दिसले. आ.जगताप यांनी सोडचिठ्ठी दिली, तर शहरातून पक्षाचे नेतृत्व करण्यास आम्ही समर्थ असल्याचे संकेत कळमकर यांच्या समर्थकांनी श्रीयोगच्या दहीहंडीतूून स्पष्ट होते. दरम्यान राष्ट्रवादीकडून गतपंचवार्षिकपासून राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी स्वतंत्र तंबू ठोकत उमेदवारीच्या तयारीत आहेत. ते पवार परिवाराचे निकटवर्तीय मानले जातात.


'नगर'वर भाजपाचा दावा
संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, श्रीगोंदे व नगर शहर या पाचही जागांवर निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांच्या मुलाखती भाजपकडून घेतल्या जाणार आहेत. युतीच्या जागा वाटपात या जागांसह कोपरगाव व शिर्डी-राहात्याची जागा शिवसेनेकडे आहे. विद्यमान आमदार असलेल्या युतीतील संबंधित पक्षांच्या जागा कायम ठेवल्यास कोपरगाव व शिर्डीच्या जागांवर शिवसेनेला पाणी सोडावे लागणार आहे. तशात राहिलेल्या पाच जागांपैकी संगमनेर, नगर व श्रीगोंदे या जागा भाजपला पाहिजे आहेत. अशा स्थितीत केवळ पारनेर व श्रीरामपूर या दोनच जागा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. सर्व जागांसाठी मुलाखती घेऊन भाजपने दुसरीकडे स्वबळाचीही तयारी ठेवल्याचे सांगितले जात आहे.





उपनेते अस्वस्थ ?

गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप शिवसेना की भाजपात प्रवेश करणार असल्याचा चर्चा समाजमाध्यमात सुरू आहे. ते खरे कि खोटे हे आगामी काळच ठरविणार आहे. परंतु, नगर शहरातील राजकारण एका बाजूला पेटले असले तरी राजकीय वर्तुळात भयान शांतता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post