राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?





माय नगर वेब टीम
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल प्रकरणी नोटीस पाठवून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांची भविष्यात चौकशी केली जाऊ शकते अशी शक्यता राजकीय जाणकारांनी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओचा झंझावात केल्यानंतरच वर्तवली होती. या संदर्भात कारवाही करण्यास सत्ताधारी पक्षाने योग्य वेळ निवडली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राज ठाकरेंना गारद करण्याचा कट रचला आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी एकत्रित भागीदार असणाऱ्या कंपनीने दादर येथे मोक्याच्या जागी असणारी, अगदी शिवसेना भवनाच्या समोर असणारी कोहिनूर मिलची जागा विकत घेतली. या जागेचा निलाव ४२१ कोटी रुपयांना झाला होता. ४२१ कोटी रुपयांच्या खरेदीत ठाकरे जोशी यांच्या कंपनीच्या सोबत समान भागीदार आयएल अँड एफएस नामक कंपनी होती. अर्थात या खरेदी व्यवहारातील ५० टक्के रक्कम आयएल अँड एफएस कंपनीने तर ५० टक्के रक्कम उन्मेष जोशी यांच्या कंपनीने भरली होती.

२०११ साली आयएल अँड एफएस कंपनीने ९० कोटींच्या तुटपुंज्या किंमतीवर कोहिनूर मिलचा आपला भाग उन्मेष  यांच्या कंपनीला विकला. गुंतवणूक २२५ कोटींची असून ९० कोटी रुपयांना आपला भाग आयएल अँड एफएस कंपनीने कसा काय विकला या बद्दल संशय व्यक्त केला जात होता. अशातच आयएल अँड एफएस कंपनी तोटा सहन करून उन्मेष  यांना कोहिनूरचा हिस्सा विकून देखील त्यांनाच कर्ज स्वरूपात रक्कम देत होती.


उन्मेष जोशी यांच्या कंपनीने आयएल अँड एफएस या कंपनीकडून ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज चुकते करण्यास उन्मेष जोशींची कंपनी असमर्थ होती म्हणून त्या बदल्यात त्यांच्याकडून त्या किंमतीची जागा घेण्याचा निर्णय आयएल अँड एफएस कंपनीने केला. २०११ साली झालेला जागेचा व्यवहार २०१७ साली सरकारी दप्तरी नोंदवला गेला. या व्यवहारात काही तरी काळबेर आहे असा संशय ईडीला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना चौकशीला बोलवण्यात आले आहे. ईडी राज ठाकरे यांच्याकडे काय चौकशी करते तसेच हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post