अवैध धंद्यांचा बंदोबस्त करणार



पीआय देशमुख । ब्राह्मणीसह तीन गावांची शांतता समितीची बैठक

माय नगर वेब टीम

अहमदनगर- ब्राह्मणी परिसरातील अवैध धंद्याविषयी माहिती द्या, तात्काळ बंदोबस्त करतो असे आवाहन राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले. गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणी, चेडगाव, मोकळ ओहळ या तीन गावांची एकत्रित बैठक शनिवारी ब्राह्मणी ग्रामपंचायतसमोरील सांस्कृतिक भवनात पार पडली. या वेळी ते बोलत होते. चांगल्या कामासाठी पोलिस मित्र म्हणून जनतेची साथ हवी आहे. पाठीशी न घालता वस्तूस्थितीनुसार कारवाई करणार, दारू, मटका, सोराट, जुगार आदी अवैध धंदे बंद करण्यासाठी माहिती द्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. दरम्यान गणेशोत्सव व मोहरम साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. रस्त्यात मंडप न उभारणे, गणेश मूर्तीचे संरक्षण, मंडळाची ऑनलाइन परवानगी, वेळेत विसर्जन, डिजेमुक्त मिरवणूक आदी बाबत पीआय देशमुख व पीएसआय सतिष शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या ब्राह्मणी गावात सालाबादप्रमाणे गणेशोत्सव व मोहरम शांततेत पार पाडण्याकामी सर्व ग्रामस्थ प्रयत्नशील राहतील असे आश्वासन ग्रामस्थ व गणेश मंडळांनी दिले. यावेळी सरपंच प्रकाश बानकर, तंटामुक्ती अध्यक्ष केशव हापसे, माणिक तारडे, महसूल मंडळ अधिकारी सी.ए देशमुख, कैलास घुमे, ग्रा.प सदस्य रंगनाथ मोकाटे, उमाकांत हापसे, बाबासाहेब भवार, पोलिस नाईक दिनकर चव्हाण, रवींद्र वैरागर, प्रेमसुख बानकर प्रसाद बानकर, कामगार तलाठी अंकुश सोनार, विजय सूर्यवंशी, नासिर शेख, दिलावर शेख, इस्माईल शेख, मंजुर शेख आदी उपस्थित होते. आभार गणेश हापसे यांनी मानले. यावेळी महसूल म मंडळाचे सदस्य, मुस्लिम बांधव, महसूल, महावितरण विभाग, ग्रामपंचायत व विविध संस्थेचे आजी- माजी पदाधिकारी, व्यावसायिक, तरुण विद्यार्थी आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post