'त्या' विघ्नसंतोषी राजकारण्यांनी 'सीना'चे काम दमबाजी करुन बंद पाडले


माय नगर वेब टीम

अहमदनगर - नगर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच नगर शहरातील विद्युत विभागाचे पोल व तारा जमिनीअंतर्गत टाकून घेण्यासाठी निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापौर झालो तेव्हा सीना नदीच्या सुशोभिकरणासाठी अर्थमंत्री व पालकमंत्री दिलीप वळसे पाटील असताना त्यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी लगेच सुशोभिकरणासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूरही केला होता व कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली होती. परंतु काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी काम होऊ न देण्यासाठी अधिकार्‍यांना दमबाजी करुन काम बंद पाडले. पण नंतर आमदार झाल्यानंतर सीना नदीच्याच्या सुशोभिकरणासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविला व त्यानंतर शासनाने जिल्हाधिकार्‍यांना आदेश देऊन नदीची हद्द निश्चिती करण्यात आली व त्यातील अतिक्रमणे काढण्यात आली. सीना नदीच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


आ. जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून गुलमोहोर रोडवरील आनंद विद्यालय परिसरातील बंद पाईप गटार काम व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ अशोक सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते. यावेळी नगरसेविका शोभाताई बोरकर, ज्योतीताई गाडे, नगरसेवक संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब बारस्कर, विनित पाऊलबुद्धे, अमोल गाडे, सदानंद कुलकर्णी, दौलत शिंदे, शाम जोशी, मनोज बजाज, किसन तरटे, रावसाहेब म्हस्के, नंदकिशोर मगर, योगेश भापकर, विश्वनाथ पोखरकर, शारदा पोखरकर, नितेश झावरे, विकास पोखरकर, संग्राम भदगले, अभिलाषा मदान आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, नगर शहराचा विस्तार आता झपाट्याने होत आहे. यासाठी पाईपलाईन रोडला पर्यायी रस्ता म्हणून तपोवन रस्त्याचे काम हाती घेतले आहे. गुलमोहोर रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या सहकार्यामुळे नगर शहराच्या विकासाला चालना देण्यात यशस्वी झालो. विकास कामांमध्ये कधीही पक्षीय राजकारण आणले नाही. सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभाग क्र. 4 च्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना अशोक सोनवणे म्हणाले की, नगर शहराला एक तरुण आमदार मिळाले आहेत. त्यांची काम करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे शहरामध्ये विविध विकास कामे होत आहेत. कुठलेही काम घेऊन गेल्यावरती ती सोडविण्याची पूर्णपणे लक्ष घालून पूर्ण करत असत. गुलमोहोर रोडच्या नावाप्रमाणे गुलमोहोरचे झाडे मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी सर्व नागरिकांनी गुलमोहोराची झाडे लावावीत व पर्यावरण सुशोभिकरणात आपलाही मोलाचा हातभार लावावा. आ. जगताप यांनी विकास कामाबरोबर शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आयटी पार्कच्या माध्यमातून छोटंस पाऊल उचललं असल्याचे ते म्हणाले.
तसेच यावेळी अजिंक्य बोरकर म्हणाले की, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला आ. जगताप यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोनवेळा नगरसेवक करण्याचे काम केले. प्रभाग 4 मध्ये आ. जगताप यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावली आहेत. प्रभागाच्या विकास आराखडा तयार केला आहे. त्याप्रमाणे आम्ही कामे करत आहोत. जमिनीअंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन, बंद पाईप गटार आदी कामे मार्गी लावतो व त्यानंतर रस्त्याची कामे हाती घेतो. प्रभागामध्ये ओपण स्पेसमध्ये सुशोभिकरण करुन प्रभागातील नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करुन देत आहोत. नागरिकांना विकास कामांत सहभागी करुन घेतल्यामुळे दर्जेदार कामे होत आहेत. प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून यापुढील काळातही मोठा निधी उपलब्ध करुन देऊ असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा पोखरकर यांनी केले व आभार नगरसेविका ज्योती गाडे यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post