आरोग्यदूत आणि डॉक्टरांच्या सेवेने नेवासेकर भारावले



आरोग्य महाकुंभात हजारो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार


माय नगर वेब टीम

अहमदनगर - विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या आणि महागड्या आरोग्यसेवा परवडत नसलेल्या रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आरोग्य महाकुंभास नेवासा तालुकावासियांनी चांगला प्रतिसाद दिला. विविध ठिकाणांहून आलेल्या नामांकित डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. या महाआरोग्य शिबिरासाठी राबणारे हजारो आरोग्यदुतांचे हात आणि त्यांना सेवाव्रती डॉक्टरांची साथ यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या संकल्‍पनेतून मतदारसंघातील गरजू आजारी रुग्णांना लाभ व्‍हावा यासाठी या महा आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. त्याचे उद्घाटन गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराज, 1008 बालब्रह्मचारी महाराज, हभप अशोक महाराज, बालब्रह्मचारी महाराज (जंगली महाराज आश्रम) हभप खरात महाराज, हभप काटे महाराज, हभप कांकरिया महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, डॉ. उदय कुमार बल्लाळ, डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र होमिओपॅथीक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जि.प. सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, तहसीलदार रुपेश सुराणा, अमोल सोनार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूयवंशी, डॉ. दिलीप पवार, गणेश चित्ते, ज्ञानेश्वर पेचे, प्रभाकर शिंदे, डॉ. रागिनी पारीख. डॉ. मिलिंद निकुंभ डॉ. गणेश चित्ते पाटील, डॉ. अजय चंदनवाले आदींची उपस्थिती होती.

नगर-औरंगाबाद रोडवर नेवासा फाटा (रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ) येथे हे महाआरोग्य शिबिर झाले. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य रुग्णालय, याठिकाणी दिनांक 25 तारखेपासूनच रुग्णांची पूर्वतपासणी कऱण्यात आली होती. त्यातून पुढील उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णाऩा या शिबिरात बोलावण्यात आले होते. या रुग्णांची तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या कुटुंबियांची विशेष काळजी घेण्यात आली. तपासणीसाठी मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक, आस्थेने विचारपूस करणारे आरोग्यदूत आणि अतिशय जिव्हाळ्याने रुग्णांशी संवाद साधत उपचार करणारे डॉक्टर्स असे चित्र येथे पाहावयास मिळाले.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर येथील दीड हजाराहून अधिक नामांकित तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्णांच्या माहितीसाठी चौकशी कक्ष, विविध आजारानिहाय तपासणी कक्ष शिबिराच्या ठिकाणी उभारण्यात आले होते. विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे शिकाऊ डॉक्टर्स, नामांकित डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना पाणी, नाष्टा आणि भोजनाची सोयही करण्यात आली होती.

महाआरोग्य शिबिरातील सर्व आरोग्यसेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या. रुग्णांची तपासणी करुन आवश्यक असेल तर थेट जागेवर उपचार किंवा शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर संदर्भ कार्ड वाटप करण्यात आली.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या सर्व यंत्रणा, आरोग्य विभाग आदी यांत सहभागी झाल्या. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, पर्यवेक्षिका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, औषध वितरण अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी, होमगार्डस यांचा सक्रिय सहभाग हे या महा आरोग्य शिबिराचे वैशिष्ट्य ठरले.

या शिबीरात तपासणी करण्यात येणा-या रुग्णांसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यात आला होता. त्याचे वितरण करण्यात आले. विविध स्वयंसेवी संस्था, संघटना यांनीही या महाआरोग्य शिबिराच्या आयोजनात सहभाग दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post