26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली
माय नगर वेब टीम
अहमदनगर - 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लयातील शहिद जवान व पोलिसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद, पोलीस दल व युवानच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. भारत माता की जय..., वंदे मातरम...च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. तर संविधान दिनानिमित्त युवकांना नागरी कर्तव्ये पार पाडण्याची शपथ देण्यात आली.
हुतात्मा स्मारकावर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कोतवालीचे पो.नि. विकास वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, लायन्स क्लबचे रिजन चेअरमन हरजितसिंह वधवा, झोन चेअरमन दिलीप कुलकर्णी, लायन्सचे अध्यक्ष आनंद बोरा, सतीश बजाज, युवानचे संदिप कुसळकर, धनंजय भंडारे, सुधीर लांडगे, अभिजीत लुणिया, शांता ठुबे, शुभांगी आव्हाड, जस्मित वधवा, नलिनी गायकवाड, सोमनाथ जंगम, मल्लेश नल्ला, पुरुषोत्तम झंवर आदींसह युवक व नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची आहुती देणार्या जवान व पोलीसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. संविधानाने बहाल केलेली नागरी कर्तव्ये नागरिकांनी पार पाडल्यास शत्रू व दहशतवाद्यांना हल्ले करता येणार नसल्याचे स्पष्ट करुन, उपस्थितांना नागरी कर्तव्य पार पाडण्याची व देश रक्षणासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली. पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी शत्रू राष्ट्र दहशतवादी कारवाया करुन राष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीच पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवादी कारवाया केल्या आहेत. कसाब सारख्या दहशतवाद्याला जीवंत पकडल्याने ही बाब उघड झाली. असे हल्ले परतून लावण्यासाठी पोलीस व लष्कर सज्ज आहे. मात्र प्रत्येक नागरिक सजग व जागृक झाल्यास कोणताही शत्रू राष्ट्र भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment