ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेचे तहसीदारांना निवेदन


माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा किंवा राहिलेले पंचनामे करावे या मागणीसाठी नगर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

नगर जिल्ह्यात क्यार वादळ यामुळे खरिपाच्या अखेरीस व रब्बीच्या सुरुवातीस संततधार तसेच काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीपाची काढण्यात आलेली पिके कांदा, सोयाबीन, यासह फळबागेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपाची कोणत्याही प्रकारचे पीक हातात आले नाही. काही ठिकाणी सोयाबीन व कांदा भुईमूग ही पिके लवकर काढली गेली. ती पंचनामा करतेवेळी शेतात नसल्याने पंचनामे झाले नाहीत. तसेच 8 व 9 ऑक्टोबर 2019 रोजी तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने फळबाग धारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु शासनाने कोणत्याच शेतकऱ्यांची पंचनामे केले नाहीत. असे तालुक्‍यात सुमारे साडेतीनशे हेक्टर क्षेत्र आहे.




हे सर्व शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिला आहे. वास्तविक पाहता शासनाच्या 18 नोव्हेंबरच्या शासन निर्णयामध्ये फळबाग धारक शेतकऱ्यांसाठी रुपये 18 हजार हेक्टरी मदत जाहीर केली. परंतु केवळ पंचनाम्याअभावी त्यांना ती मदत तूर्तास मिळणार नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता खरीप व रब्बी ही दोन्ही पिके हाती आलेली नाहीत. त्यामुळे एक तर ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा राहिलेले पंचनामे करावेत व अडचणीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आमची मागणी मान्य करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन नगर तहसीलदार उमेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, अनिल कराळे, उपसभापती प्रविण कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post