आरोग्यदूत : फास्ट फूड




माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बर्गर्स, नूडल्स, रोल्स आणि कित्येक प्रकारचे तळलेले अन्नपदार्थ हे कित्येक मुलांचे आवडते अन्न बनले आहे. अगदी भरपूर तळलेले पदार्थ असतील, तरच ती खातात. फास्ट फूडमध्ये बर्‍याच प्रमाणात स्टार्च, स्निग्ध पदार्थ आणि मीठ असते. प्रौढांप्रमाणेच तीन वर्षांपुढील मुलांनाही त्यांच्या दैनंदिन उष्मांकामधून 30 टक्क्यांहून अधिक उष्मांक स्निग्ध पदार्थातून मिळता कामा नयेत.

त्यांच्या आहारातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण समतोल बनवण्याची एक पद्धत म्हणजे फक्त स्किम मिल्क किंवा कमी स्निग्धांशाचे चीज वापरा. रात्रीच्या जेवणापूर्वी चिरलेल्या फळांची वाटी  तयार करा. यात संत्री किंवा मोसंबीच्या फोडी आणि सफरचंदाच्या फोडी असाव्यात. यावर ताव मारल्यावर मुलांना तेलकट पदार्थांचे फारसे आकर्षण वाटत नाही. याशिवाय फास्ट फूडचे अधिक आरोग्यदायी पदार्थही तयार करता येतात. उदाहरणार्थ, ओव्हनमध्ये फ्राय केेलेले चिकन, मोझारेल्ला चीज वापरून तयार केलेल पिझ्झा, मायक्रोवेव्हमध्ये तयार केलेले पॉपकॉर्न इ.

गोड पदार्थावर बंधन घाला

निम्मीला चॉकलेट्स, कँडीज, आइस्क्रीम, शेक्स आणि बिस्किटे आवडतात. गेला बाजार साधी साखरसुद्धा तिला चालते. परंतु काही तर गोड तिला हवेच असते. तिच्या आईने गोड पदार्थांवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की निम्मी लबाडी करून अधाशीपणे एकाच वेळी भरपूर खाऊ लागली. घरातील फ्रीज आणि कपाटात शीगोशीग गोड वस्तू भरून ठेवलेल्या असतील. तर त्या खाण्यावर बंदी घालून काहीच उपयोग होणार नाही. उलटपक्षी बंदी घातल्यामुळे गेड खाण्याची इच्छा बळावेल. कोणत्याही गोष्टीवर बंदी घालणे हा उपायच नाही. क्वचितप्रसंगी चॉकलेट किंवा आइस्क्रीम खाऊ देण्याने त्या विषयीची आसक्की कमी होते आणि त्यामुळे कमी प्रमाणात गोड खाल्ले जाते. गोड पदार्थ कमी प्रमाणात खाऊन पालक आणि इतर कुटुंबियांनी मुलांसमोर आदर्श ठेवला पाहिजे.

चरत राहण्याला आळा घातला पाहिजे

दोन जेवणाच्यामध्ये सारखे काहीतरी खात राहणे किंवा ज्याला आपण बोलीभाषेत चरत राहणे म्हणतो. ते करणे कित्येक मुलांना आवडते. त्यावर बंधन घातले गेलेनाही तर अशी मुले नीट जेवत नाहीत आणि अशा सटरफटर गोष्टींवरच पोट भरण्याची सवय त्यांना लागते. खाद्यपदार्थही महत्त्वाचे असतात; परंतु न जेवल्यामुळे त्यांना समतोल आहार मिळत नाही. शिवाय अति उष्मांक पोटात गेल्यामुळे त्यांचे वजनही वाढते. (पोटात गेलेले उष्मांक आणि शरीराने बाहेर टाकलेले उष्मांक यांच्यात समतोल साधला गेला. तरच वजनही समतोल राहतो.)

मुलांना खाद्यपदार्थ अजिबातच देऊ नका, असे मी म्हणत नाही. त्याऐवजी त्यांना कमी उष्मांकाचे, कमी स्निग्धांश असलेले पदार्थ द्या. सुमारे 100 किंवा त्याहूनही कमी उष्मांकांचे पदार्थ त्यांना द्या. दुपारच्या जेवणापूर्वी एक खाद्यपदार्थ मुलाने निवडावा. दोन पदार्थ दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणादरम्यान खावेत आणि रात्रीच्या जेवणानंतर एक पदार्थ खावा.

मुलाला योग्य प्रकारे समतोल आहार घ्यायला लावण्याचा सर्वाधिक उत्तम उपाय म्हणजे घरात समतोल आहार उपलब्ध असला पाहिजे. यासाठी समतोल आहार म्हणजे काय आणि त्यामध्ये कशा प्रकारे कोणते पदार्थ समाविष्ट करावेत याचे ज्ञान पालकांना असले पाहिजे. तुम्ही योग्य आहार घेत असाल, तर तुमचे मूलही सहसा योग्य आहार घेते.

भूकवाढीला उत्तेजन देणार्‍या पदार्थांची भूमिका

भूक न लागणे हे बहुतेक सर्वच आजारांचे प्राथमिक लक्षण असते. घशाचा संसर्ग (टॉन्सिलायटिस आणि फॅरिन्जायटिस), तोंडाचे अल्सर, कानाचा संसर्ग विषाणूजन्य संसर्ग, गोवर, कांजण्या, पोटदुखी, पोटात गुब्बारा धरणे, मूत्राशयाचा संसर्ग इ. सर्व प्रकारच्या आजारात मुलांना भूक लागत नाही. त्यांची अन्नावरची वासना उडते.

मुलांना भूक वाढीसाठी टॉनिक किंवा औषधे द्यावे का? याविषयी मतमतांतरे आहेत. काही डॉक्टर त्यांचा वापर करतात. काही अजिबात करत नाहीत. अशा टॉनिकचा किंवा औषधांचा वापर न करण्याविषयीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही भूकवाढ तात्पुरती असते. औषध घेणे थांबवल्याबरोबर भूक लागणे बंद होते. याशिवाय कोणत्याही औषधाचे दुष्परिणाम असतातच.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post