ब्रेस्ट कॅन्सर,अनेक शंका


माय अहमदनगर वेेेब टीम
हेल्थ डेस्क - रुग्णाचे वय, प्रकृती, कॅन्सरचे प्रमाण याच्या आधारावर हा उपचार ठरविण्यात येतो. गाठ दोन सेंटीमीटरची असेल, म्हणजे आजार प्राथमिक अवस्थेत असेल तर किमोथेरपीची गरज नसते. वाढलेल्या अवस्थेतच आजाराचे निदान झाले तर आधी हा उपचार करून गाठ कमी केली जाते.

किमोथेरपीबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. मात्र, हल्ली आधुनिक इंजेक्शनमुळे हा त्रास कमी झाला आहे. या इंजेक्शनमुळे अशक्तपणा, उलट्या, जुलाब, ताप येणे, केस गळणे, रक्त कमी होणे यासारखे त्रास होतात. हा उपचार तीन ते चार महिने चालतो. उपचार सुरू असतांना रुग्णाने भरपूर पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. उपचार संपल्यावर केस परत येतात व रक्ताचे प्रमाणही पूर्ववत होते.

हार्मोन थेरेपीतील संप्रेरकांमुळे शरीरातील पेशींचे काम नियंत्रित केले जाते. स्तनाच्या कॅन्सरचे एक कारण संप्रेरकांमध्ये असल्याने टॅमोक्सीफेन लेट्रोझोल या गोळीमुळे संप्रेरकांचा कॅन्सर पेशींवर होणारा प्रभाव कमी करता येतो. रुग्णाचे वय, ऋतूनिवृत्ती, आजाराचे प्रमाण आणि संप्रेरकांची एक तपासणी यावर हा उपचार ठरवण्यात येतो.

शस्त्रक्रिया, कमोथेरपी अथवा रेडिओथेरपी असे कोणतेही उपचार केल्यावर दर महिन्याला कॅन्सर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे असते. उपचारानंतर पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता पहिल्या दोन वर्षात असते. तसे झाल्यास नियमित तपासणीत तो लगेचच लक्षात येतो व वेळीच त्यावर इलाज करता येतो. या पुनर्तपासणीसाठी प्रत्येक वेळी एक्स-रे किंवा सोनोग्राफीची आवश्यकता नसते.

वयात येणे, मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण, पाळी जाणे अशावेळी स्त्रियांच्या स्तनांचा आकार बदलत असतो. पण ते बदल तात्पुरते असतात. स्तनांची नियमित तपासणी केली तर ते लक्षात येतात. स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार्‍या या व्याधीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या स्तनांची नियमित तपासणी करण्याची गरज असते. ही तपासणी घरच्या घरी करता येते. यामुळे कॅन्सरचे निदान लवकर झाले तर प्राथमिक अवस्थेतच उपचार करता येतात. आणि ते यशस्वीही होतात.

प्रत्येक स्त्रीने वयाच्या तिसाव्या वर्षानंतर स्तनांच वैयक्तिक तपासणी केली पाहिजे. मासिक पाळीच्या आठव्या ते दहाव्या दिवशी ही तपासणी करता येते. त्यासाठी आरशासमोर उभे राहून दोन्ही स्तनांचे निरीक्षण करावे. यात स्तनांचा बदललेला आकार, गाठ, निपलमधील बदल, जखम, स्तनाच्या त्वचेतील बदल, निपलमधून होणारा रक्तस्त्राव याचे निरीक्षण करावे. दोन्ही हात कमरेवर ठेवून दाब द्यावा. त्यामुळे छातीचे स्नायू कडक होऊन गाठ असल्यास  लक्षात येते. खाली झोपून उजव्या हाताच्या बोटांनी व तळव्यांनी डाव्या स्तनाची, तर डाव्या हाताच्या बोटांनी व तळव्यांनी उजव्या स्तनाची तपासणी करावी. स्तनात गाठी असल्यास या तपासणीत लक्षात येते. अशाप्रकारे खांद्यापासून बरगड्यांपर्यंत प्रत्येक स्तनांची गोलाकार तपासणी करायची. या तपासण्या आंघोळ करतांनाही करता येतात.

स्तनाच्या कॅन्सरबद्दल अनेकांच्या मनात अनेक शंका असतात. स्तनाचा कॅन्सर झालेली स्त्री आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल अत्यंत साशंक असते. मात्र उपचार सुरू असतांनाही स्त्रिया वैवाहिक आयुष्य जगू शकतात. उपचारानंतर एक-दोन वर्षात अशा स्त्रिया मातृत्वाचा लाभही घेऊ शकतात. या दरम्यान रुग्ण सर्व दैनंदिन कामे करू शकतात. उपचारादरम्यान भरपूर प्रथिनयुक्त आहार घ्यावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post