विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवावा - आ.संग्राम जगताप


राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेतील यशाबद्दल जागृती बागलचा सत्कार

माय नगर वेब टीम
अहमदनगर - बालवयात आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा क्षेत्रामधील खेळामध्ये भाग घेतला पाहिजे. क्रीडा क्षेत्रातही आजच्या विद्यार्थ्याला आपले करीअर करता येत असते. क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षणामध्ये जास्त गुण प्राप्त होते. तसेच शासकीय सेवेत भरती केले जाते. विविध शासनाच्या योजनांचा क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्याला लाभ मिळतो. यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवावा असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

नंदूरबार जिल्हा येथे झालेल्या ३० व्या राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेमध्ये कु.जागृती बागल यांनी दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांनी तिचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अनुप काळे, अजय औसरकर, राजेश देशमुख, महेश बागल, प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, सागर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले, क्रीडा क्षेत्रामध्ये खेळणारा विद्यार्थी हा निरोगी राहतो. खेळामुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार बनतो. यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी खेळामध्ये भाग घ्यावा. कु.जागृती बागल हिने राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व केले. चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवत नगरला बहुमान मिळवून दिला याबद्दल नगरकरांच्यावतीने तिचा गौरव केला जात आहे.

यावेळी नगरसेवक गणेश भोसले म्हणाले की, आजचा विद्यार्थी हा मैदानी खेळापासून लांब चालला आहे. खेळापेक्षा तो टीव्ही आणि मोबाईलमध्येच जास्त व्यस्त असतो. आजची पिढी क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. खेळामुळे समाजामध्ये विद्यार्थ्याला प्रतिष्ठा मिळते. सन्मान मिळतो. खेळामुळे विद्यार्थी समाजामध्ये विविध क्षेत्रात आपले योगदान चांगले देऊ शकतो यासाठी प्रत्येक विद्यर्थ्याने शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळावे असे ते म्हणाले.

नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले- कु. जागृती बागल हिने बालवयातच राज्यस्तरीय पातळीवर आपले क्रिडा कौशल्य दाखवत दुसरा क्रमांक प्राप्त केला. आजच्या विद्यार्थ्याला कुठल्याही क्षेत्रात योग्य मार्गदर्शनाची गरज असते. विद्यार्थ्याच्या पाठिवरती शाब्बासकीची थाप देणे गरजेचे असते. त्याला धिर देण्याचे काम केले पाहिजे. त्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच शहरातील प्रत्येक खेळाडूचा सन्मान आम्ही करतो असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post