माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेचा पथदिव्यांच्या विजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी संपुर्ण शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेेच्या विचाराधीन असून अशा प्रकारचा प्रकल्प राबविलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्युत विभागाला दिले आहेत.
शहरातील पथदिव्यांबाबतच्या वारंवार येणार्या तक्रारींसंदर्भात महापौर वाकळे यांनी शुक्रवारी (दि.29) सायंकाळी विद्युत विभागाची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवक विनित पाऊलबुधे, सुनिल त्र्यंबके, रविंद्र बारस्कर, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, संजय ढोणे, सुरज शेळके, सतिष शिंदे, विद्युत विभागप्रमुख कल्याण बल्लाळ यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत विद्युत विभागाच्या सध्या सुरु असलेल्या कामकाजाबाबत महापौर वाकळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्युत विभागाचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाही. नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, यापुढील काळात हे खपुन घेतले जाणार नाही. कामचुकार करणार्या कर्मचार्यांवर कायदेशिर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
शहरातील पथदिव्यांच्या विजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी संपुर्ण शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव आहे. हे दिवे लावल्यानंतर किती विजबचत होईल तसेच एलईडी दिव्यांसाठी महापालिकेला किती खर्च येईल, कोणत्या रस्त्यावर किती वॅटचे दिवे लावावे लागतील, कॉलनीत किती वॅटचे दिवे लागतील याचा अभ्यास करुन तसेच अशाप्रकारचा प्रकल्प राबविलेल्या इतर महापालिकांमधून याबाबत माहिती घेऊन परिपुर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा असे आदेशही यावेळी महापौर वाकळे यांनी दिले.
महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुखपदी अभियंता कल्याण बल्लाळ यांची नियुक्ती केलेली आहे. या बैठकीत अभियंता बल्लाळ यांनी आपण सिव्हील इंजिनइर असून विद्युत विभागाचा कुठलाही अनुभव आपणाला नाही. त्यामुळे माहिती नसलेल्या कोणत्याही प्रस्तावावर आपण सही करणार नाही. मला जेलमध्ये जायचे नाही. त्यामुळे विद्युत विभागाच्या प्रमुखपदी त्या विभागाची माहिती असलेला विद्युत अभियंता नेमावा अशी मागणी अभियंता बल्लाळ यांनी यावेळी केली.
Post a Comment