'या' कारणामुळे अहमदनगर मोबाईल रिटलेर्स असोसिएशनची काचेरीसमोर निदर्शने



माय नगर वेब टीम
अहमदनगर : केंद्र सरकारने परकीय कंपन्यांना एफडीआयच्या माध्यमातून भारतातील ई कॉमर्स क्षेत्रात प्रवेश दिल्यापासून अनेक कंपन्या एफडीआयमधील अनेक तरतुदींचे उल्लंघन करून व्यवसाय करीत आहेत. विशेषत: मोबाईल विक्री क्षेत्रात या कंपन्यांनी अनेक नियमांची पायमल्ली चालवली असून या कंपन्यांना आवर घालण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या प्रकरणात लक्ष घालून देशभरातील मोबाईल रिटेलर्स व्यावसायिक उदध्वस्त होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी मागणी अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने केली आहे. याबाबत असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्यामार्फत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ई कॉमर्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला.
यावेळी असोसिएशनचे अजित जगताप, शुभम जगताप, साजीद खान, मारुती पवार, सचिन ढवळे, पंकज सदरे, मनोज बलदोटा, संतोष बलदोटा, प्रितम तोडकर, राम मेघनानी, अजित पवार, आकाश घाटविसावे, मनिष चोपडा, महेश घावटे, गोरख पडोळे, भुपेंद्र रासने, हिराशेठ खुबचंदानी, उमेश धोंडे, अतुल रच्चा, सागर नहार, प्रविण गाली, निलेश पडोळे, विनीत खंडेलवाल, राजेश सोनवणे, दीपक गुरुनानी आदी उपस्थित होते.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मोबाईल विक्री क्षेत्रात देशभरात तसेच नगरमध्येही अनेक छोटे विक्रेते कार्यरत असून ते रिटेल विक्रीचा व्यवसाय करतात. परंतु, देशात एफडीआयअंतर्गत अनेक मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांचे आगमन झाल्यावर या क्षेत्रात असमतोल स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या अनेक सवलतींच्या घोषणा करतात. याशिवाय वेगवेगळ्या मार्गाने आपली विक्री वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याने छोट्या रिटेलर्सच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. मोबाईल विक्रीच्या व्यवसायात अनेक लहान विक्रेते कार्यरत आहेत. त्यांना या बड्या कंपन्यांच्या आक्रमक व नियमांचे उल्लंघन करून केल्या जाणार्‍या स्पर्धेशी तोंड देणे अवघड झाले आहे. या कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सरकारच्या महसूलावरही परिणाम होत आहे. छोट्या व्यावसायिकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचे काम ई कॉमर्स कंपन्या करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच कायदा पालन सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे. असे असताना ई कॉमर्स क्षेत्रातील बड्या कंपन्या कायदे पायदळी तुडवून छोट्या विक्रेत्यांना उद्ध्वस्त करीत आहेत. याला वेळीच पायबंद घालावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पुढच्या टप्प्यात विक्रेते रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत. नगरमधील सर्व विक्रेते यात सहभागी होतील. यानंतर देशपातळीवरील आंदोलन नवी दिल्लीत केले जाणार आहे. ग्राहकांनीही ऑनलाईन खरेदीच्या जंजाळात न अडकता विश्वसनीयता असलेल्या स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी. ई कॉमर्स कंपन्यांकडून अनेकवेळा विक्री पश्चात सेवाही मिळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा खरेदीनंतर मनस्ताप सहन करावा लागतो. परकीय कंपन्या फक्त नफाखोरी करीत असून यातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होत नाही. या बाबी लक्षात घेता ग्राहकांनी आपली खरेदी स्थानिक पातळीवरच रिटेलर्सकडून करुन आपल्या स्थानिक बाजारपेठेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही मोबाईल असोसिएशनने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post