राजकीय सत्तानाट्य : काकांची फूस कि दादांचे बंड




माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र गाढ झापेलेला असताना पहाटेच्या वेळी राजकीय भूकंप घडला. त्याचे धक्के इतक्या जोरात होते की कधीकाळी घडलेला ‘पुलोद’चा भूकंपसुद्धा फिका ठरावा. राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी त्याच्या काकांना शेंडी लावली. भाजपशी हात मिळवणी करत राजभवनाची पायरी चढत ते पुन्हा एकदा उपमुख्यंमत्री पदाच्या बोहल्यावर चढले. या सर्व वेगवान घडामोडी घडत असताना ही ‘स्क्रिप्ट’ दस्तुरखुद्द शरद पवारांची होती की खरोखर हे अजित दादांचे बंड होते, या चर्चेने जोर धरला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राजकारणात दुसर्‍यांचे घर फोडले हा आरोप त्यांच्यावर नेहमी होत राहिला आहे. मात्र आता पवार कुटुंबातच फूट पडली आहे. राजकारणात अजित पवार यांची प्रतिमा ‘अ‍ॅग्री यंग मॅन’ अशी आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे ही दादांची महत्त्वाकांक्षा कधीही लपून राहिली नाही. सन 2004 च्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा मित्रपक्ष राष्ट्रवादीचे जादा जागा आल्ंया होत्या. अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र तेव्हा पवारांनी मलईदार मंत्रिपदे घेत दादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षेवर पाणी फेरले होत. तेव्हा देखील ही ‘आमच्या बापजाद्यांची चूक होती’ म्हणत दादा नॉट रिचेबल झाले होते.

नंतर पवारांनी डोळे वटारल्यावर दादा वठणीवर आले होते. अजित दादा मुख्यमंत्री झाले असते तर हाताबाहेर गेले असते, हे सिनिअर पवारांना ठाऊक होते. यंदादेखील महाआघाडित सत्ता वाटपाचे ज्या पद्धतीने पत्ते पिसले जात होते ते बघात अजितदादा अस्वस्थ होते. पाच वर्षासाठी सेनेला मुख्यमंत्रिपद तर काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद दिले जाणार होते. प्रारंभी शिवसेना व राष्ट्रवादी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेतील अशी चर्चा होती. मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळाले असते तर अजितदादांनाच सीएम करावे लागले असते.

त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा हे पद शिवसेनेला पाच वर्षासाठी दिले. हे दोन्ही पदे दिली जाणार नसल्याने दादा नाराज होते. शेवटी त्यांनी काकांविरुध्द बंडाची तुतारी फुंकली. त्यांनी भाजपशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र या सर्व घडामोडींमागे ‘अदृश्य’ हात असल्याचीदेखील चर्चा आहे. हे हात कोणाचे असतील हे वगळे सांगण्याची गरज नाही.

राजकारणाची हवा ओळखण्यात तरबेज असलेल्या पवारांना त्यांच्या पुतण्याचे पावले बंडाकडे वळता हे समजले नाही का, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवारांचे आज पर्यंतचे राजकारण बघता दादांचे हे खरच बंड आहे की त्यांना फूस देण्यात आली, याचे उत्तर सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

लोकसभेला पुत्र पार्थ याचा पराभव झाला. त्यांच्या उमेदवारीवरुन काका विरुध्द पुतण्या हा वाद झाला होता. विधानसभेला दादांचे पुतणे रोहित पवार हे निवडून आले. तसेच, शरद पवार राज्यात त्यांचा वारसा म्हणून सुप्रिया सुळेंना पुढे आणू इच्छित आहे. या सर्व घटना बघता त्यातूनच बंडाची बीजे रोवली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post