पुरस्कारप्राप्त शिक्षिकांनी किमान तीन मुले दत्तक घ्यावीत -शिंदे
प्राथमिक शिक्षक बँकेकडून महिला शिक्षकांचा सन्मान
सावित्रीच्या लेकी पुरस्काराने गौरव
माय नगर वेब टीम
अहमदनगर- प्राथमिक शिक्षकांचे पगार आता भरपूर वाढले आहेत. त्यांनी पगारातील किमान पाचशे रूपये उपेक्षित मुलांसाठी खर्च केले पाहिजेत. तसेच पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिकांनी तीन मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली पाहिजेत तरच आपण सावित्रीच्या लेकी आहोत ही उपाधी सार्थ ठरेल, अशी भावना कवियत्री व लेखिका डॉ. स्वाती शिंदे यांनी व्यक्त केली.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त बँकेतर्फे शंभर कर्तबगार सभासद महिला शिक्षिकांचा सावित्रीची लेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नंदनवन लॉन येथे झालेल्या या पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. शिंदे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांभोरे होते.
प्रास्तविक बँकेचे अध्यक्ष साहेबराव अनाप यांनी तर स्वागत बँकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मुखेकर यांनी केले. गुरुमाऊली मंडळ तथा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. कार्यक्रमास शिक्षण तज्ञ, अभिनेत्री जिजाऊ फेम डॉ. स्मिता देशमुख, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारी अरूण धामणे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, राज्य वखार महामंडळाचे माजी विभागीय अध्यक्ष विजयकुमार ठुबे, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब कुल, विभागीय अध्यक्ष अंबादास वाजे, आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, कैलास चिंधे, दत्ता कुलट, अरूण आवारी, संचालिका विद्युलता आढाव, अर्जुन शिरसाठ, अविनाश निंभोरे, किसन खेमनर, रामेश्वर चोपडे, नारायण पिसे, बाळासाहेब सालके, विठ्ठल फुंदे, महेश भणभणे आदींसह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाल्या, शिक्षकाशिवाय माणुस नावाच्या जातीला अर्थ नाही. आयुष्यात गुरु लागतोच. शासनाच्या बेचव खिचडीत घरातील फ्रीजमधील भाज्या अधूनमधून वापरल्या तर पोषण आहार चवदार बनेल. आपले संघटन मजबूत असेल तर कुणाला घाबरण्याचे कारण नाही. शिक्षकांनो आडव येणार्यांना तुडवा. सरपंच, चेअरमन, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना घाबरू नका. आपले काम चोख ठेवा. आपल्याला संभाजी थोरात तात्या यांच्यासारखे खमके नेतृत्व लाभलेले आहे.
श्रीमती देशमुख म्हणाल्या की, संधी टॉपरला पण मिळते व नापास झालेल्यांना पण मिळते. ही गुणवत्ता शिक्षकांना शोधता आली पाहिजे. शिक्षक केवळ मुल घडवत नाही तर समाज व राष्ट्र घडवत असतात. काठमोरे, थोरे, तांभोरे, जगताप यांचीही यावेळी भाषणे झाली. आकाशवाणीच्या श्रीमती विणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले. शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी आभार मानले.
Post a Comment