तलाठी व सचिवांच्या टोलवाटोलवीमुळे अनेक शेतकरी 'या' योजनेच्या लाभापासून वंचित


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून ही नोंदणी करण्याबाबत गावचे तलाठी आणि सेवा सोसायटीचे सचिव यांच्यात टोलवाटोलवी सुरु आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून नगर तालुक्यातील गावागावातील अनेक शेतकरी अद्याप वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे या ऑनलाईन नोंदणीची जबाबदारी नेमकी कोणाची? असा जाब आज शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विचारला.

या संदर्भात सारोळा कासारचे उपसरपंच जयप्रकाश पाटील, शिक्षकनेते संजय धामणे, सोसायटीचे संचालक संजय काळे, राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, गजानन पुंड, सुभाष धामणे यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अडवणुकीकडे लक्ष वेधले. गावात पूर्णवेळ तलाठी नाही. त्यामुळे घोसपुरी गावच्या महिला तलाठ्याकडे प्रभारी पदभार आहे. तहसीलदार यांनी 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेच्या ऑनलाईन नोंदणीची जबाबदारी सोसायटीच्या सचिवांकडे सोपविली होती. मात्र आपणाकडे ५ एकर पुढील क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदणीचीच जबाबदारी असल्याचे सांगत त्या पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे नोंदणी करावी असे ते सांगत आहेत. तर तलाठी या आपणाकडे घोसपुरीचे काम आहे. असे सांगत ऑनलाईन नोंदणीस नकार देत आहेत. या टोलवाटोलवीमुळे काही बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग झाला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतानाही मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. हा त्यांच्यावर अन्याय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

यावेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी तलाठी आणि सचिव हे दोघेही प्रभारी असल्याने सदर जबाबदारी ग्रामसेवकावर सोपविण्यात येईल. या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच लवकरच तहसील कार्यालयातही 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेबाबत मदत कक्ष सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post