'भाई' म्हणाले हाच तो निलेश लंके ; उद्धव ठाकरेंनी केले तोंडभरून कौतुक
माय नगर वेब टीम
मुंबई – राजकारणात कधी, केव्हा काहीही घडू शकतं याचा प्रत्यय शनिवारी अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर आलाच. त्याचबरोबर ज्या तालुका प्रमुखाची दोन वर्षापूर्वी पक्षातून हकालपट्टी केली. त्याच व्यक्तीची म्हणजेच पारनेर नगर चे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. आणि त्यांच्या साधेपणा व संघटन कौशल्याचे तोंड भरून स्तुती केली. रविवारी रेनी सन्स या मुंबईतील हॉटेलमध्ये हा क्षण इतर आमदारांना अनुभवायला मिळाला.
निलेश लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, पारनेरच्या तालुका प्रमुख पदावर काम करीत असताना पक्ष वाढवला त्याचबरोबर दांडगा जनसंपर्क कमावला. लंके आणि जनता हे समीकरण होत असल्याचे पाहून तत्कालीन आमदार विजयराव औटी हे त्यांना पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हणून पाहू लागले. त्यामुळे निलेश लंके यांना ते डावलू लागले. या सर्व गोष्टींमुळे दोघांमध्ये एक प्रकारे दरी निर्माण झाली. पक्ष आणि पक्षप्रमुखांनी विजयराव औटी हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना झुकते माप देत. लंके यांची दोन वर्षांपूर्वी तालुकाप्रमुख पदावरुन गच्छंती करून पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान पारनेर – नगर तालुक्यातील तरुणांची मोठी फळी निलेश लंके यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून जनसंपर्क सुरू ठेवला. दरम्यान निलेश यांची ताकत ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मनगटात वर्षभरापूर्वी घड्याळ बांधले. इतकेच नाही तर शरद पवार यांनी सुजित झावरे यांना डावलून लंके यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे जनतेने लोकवर्गणी करून ही निवडणूक आपल्या हातात घेतली. आणि निलेश लंके मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांनी विधानसभेच्या उपाध्यक्ष राहिलेल्या सेनेच्या विजयराव औटी यांना आस्मान दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो असलो तरी मी आजही बाळासाहेबांना दैवत मानतो हे निलेश लंके कायम सांगत राहिले आणि आजही मोठ्या अभिमानाने सांगतात. दरम्यान शरद पवारांनी त्यांची विक्रमादित्य, दुसरे आर . आर . पाटील या शब्दात आला कौतुक केले. लंके यांच्यातील नेतृत्वगुण पवारांनी हेरला. दरम्यान सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे बरोबर आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईतील रेनी सन्स या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी शरद पवारां बरोबरच उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेत संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे ठाकरे यांना निलेश लंके यांच्या जवळ घेऊन गेले. आणि हाच तो निलेश लंके अशी ओळख करून दिली. पक्षप्रमुखांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करीत पाठीवर हात ठेवला. तू अतिशय साधा माणूस आहेस. आम्हाला ओळखता आले नाही. पण आता आपण बरोबर आहोत अशा शब्दात त्यांनी आमदार निलेश यांना आपलेसे केले. दरम्यान शरद पवार यांची विशेष मर्जी संपादन केल्यानंतर आ. लंके हे शिवसेनेचे सर्वासर्वे उद्धव ठाकरे यांच्याही गुड बुकात पोहोचले आहेत. इतकेच नाही तर सेना नेतृत्वाला त्यांची दोन वर्षापूर्वीची चूक सुद्धा उमगली असल्याचे यावरून दिसून आले.
आ. लंके यांचा साधेपणा अनेकांच्या नजरेत भरला ; आजही हातात शिवबंधनात
रेनी सन्स या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेले सर्व आमदार आपल्या पुढारी वेशात दिसून आले. परंतु निलेश लंके घरी असताना ज्या साध्या टी-शर्ट वर असतात. तोच टी-शर्ट त्यांच्या अंगावर या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही दिसून आला. त्यांचा हा साधेपणा सर्वांच्याच नजरेत भरला. दरम्यान निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. परंतु त्यांची शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भगव्यावरची निष्ठा आजही कायम असल्याचे त्यांच्या हातामध्ये असलेल्या शिवबंधन वरून दिसून येते. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचा आनंद त्यांना आपल्या चेहऱ्यावर लपवता आला नाही.
Post a Comment