माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - भारतातील सर्व नागरिकांना मिळत असलेला अधिकार, हक्क व न्याय हे संविधानाची देण आहे. सर्व नागरिकांनी या संविधानाचा आदर करत पालन करावे. संविधानाच्या जागृती साठी विधिसेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या या व्याख्याना मुळे वकिलांच्या ज्ञानात भर पडेल, असे प्रतिपादन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.
७० व्या राष्ट्रीय संविधानदिना निमित्त जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने संविधान उद्देशिका वाचन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर व जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन झाले. यावेळी दिवाणी न्यायाधीश जी.के.नंदनवार यांचे भारतीय संविधाना बद्दल व्याख्यान झाले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधिश सुनिलजीत पाटील, न्या. ए.बी.भिल्ल्रारे, न्या. एच.एस. सातभाई, न्या. कुलकर्णी, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे, सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे, जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील आदींसह सर्व न्यायाधीश, वकील, विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
दिवाणी न्यायाधीश जी.के.नंदनवार व्याख्यानात म्हणाले, भारतीय संविधानाने संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानात मागितलेले जो जे वांछील तो ते लाभो या प्रमाणे सर्व अधिकार भारतीय संविधानाने नागरिकांना दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजपत्रही या संविधाना प्रमाणेच तत्त्वज्ञान आहे. सर्वोच्च न्यायालयानेही संविधानात दिलेले सर्व कलमांना स्वीकारून करत असलेल्या न्याय निवाडांमुळे या संविधानाला मोठे वैभाव प्राप्त झाले आहे. मात्र सध्याच्या सर्व काही इंस्टंट पाहिजे असलेल्या युवा पिढीला या संविधानाचे ज्ञान व महत्व नाहीये. तरुणांच्या मनात संविधान रुजवणे आवश्यक आहे. मात्र ते दोन जीबी डाटात आपले चोवीस तास घालवण्यात व्यस्त झाले आहेत. तरुणांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकात न्या. सुनीलजीत पाटील म्हणाले, भारतीय संविधानावरच न्यायालयाचे कामकाज चालत असून सर्व न्यायाधीश व वकील संविधानाचे पालन करत आहेत. भारताचा ७० व संविधान दिवस जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाने मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरा केला आहे. या निमित्त पुढील वर्षीच्या 14 एप्रिल पर्यंत शहरी व ग्रामीण भगत विविध कार्यक्रम व कायद्याविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवणार आहोत.
यावेळी अॅड.सुभाष काकडे यांचे मोफत विधी सेवा सहाय्य व फायदे तसेच अॅड. प्रणाली चव्हाण यांचे कौटुंबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण कायदा या विषयांवर व्याख्यान झाले. कार्याक्रमचे सूत्र संचलन अॅड. सागर पादीर यांनी केले. आभार विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य अॅड.शिवाजी कराळे यांनी मानले. यावेळी जेष्ठ अॅड. विश्वासराव आठरे, वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. सुहास टोणे, अॅड. मीनाक्षी कराळे, अॅड.के.एम.देशपांडे, अॅड. विक्रम वाडेकर, अॅड.नीलमणी गांधी, अॅड. सुजाता गुंदेचा, अॅड.समीर सोनी आदींस वकिलांच्या दोन्ही संघटनाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त प्रथम सत्रात सकाळी विधिसेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात सचिव न्यायाधिश सुनिलजीत पाटील यांनी सदस्य, वकील व विधी स्वयंसेवकंच्या उपस्थितीत संविधानाचे वाचन केले. दुपारी जिल्हा न्यायालयात सर्व न्यायाधीश व वकिलांच्या उपस्थितीत सामुहिक वाचन झाल्या नंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी संविधान जागृती रॅलीचे उद्घाटन न्या.सुनीलजीत पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ झाले.
Post a Comment