ठाकरे यांना राणेंकडून शुभेच्छा आणि इशाराही!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. नव्या सरकारने राज्याच्या हिताचे काम केल्यास या सरकारला माझं सहकार्यच असेल, असे नमूद करत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी शिवसेनेची पर्यायाने बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी आणि मराठी माणसांच्या हिताला अग्रक्रम देणारी असून त्या विचारधारेला मूठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे, असे टीकास्त्रही राणे यांनी सोडले आहे.
नारायण राणे आणि शिवसेनेतील वैर जगजाहीर आहे. त्यातून दोन्ही बाजूने सातत्याने हल्ले-प्रतिहल्ले होत असतात. आता गेल्या महिनाभरातील सत्तासंघर्ष मागे पडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असताना राणे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देताना भविष्यातील संघर्षाचेही संकेत दिले आहेत. मी राज्याचा माजी मुख्यमंत्री असल्याने राजशिष्टाचारानुसार खरंतर मला शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करायला हवं होतं. मात्र तीनपैकी एकाही पक्षाने तसं केलं नाही. असं असलं तरी मी त्याबाबत नाराज नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post