जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी समाजासाठी घातक


माय नगर वेेेब टीम
अहमदनगर – चोरच पोलिसांवर गोळीबार करून आपली दहशत निर्माण करू पाहतात, किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांतील वादातून शहरात भर लोकवस्तीत गोळीबार केला जातो, टोळी युद्धातून एकमेकांना लक्ष्य करत गोळीबार, तलवारीने, चॉपरने हल्ला होतो, लोक साखर झोपेत असताना भल्या पहाटे सराईत गुंडांकडून उद्योजकाचे शहरातून अपहरण होते, तरुणी, युवती, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस होणारी वाढ आदी प्रकार लक्षात घेता जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत चालल्याचेच समोर येत आहे.

जळगाव जिल्ह्यात खमक्या भूमिकेने चर्चेत आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू नगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत मवाळ भूमिकेत दिसत आहेत. अशीच स्थिती राहिली अन् एखादी मोठी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर पोलिसांकडे नाही.
सोनसाखळी चोरणार्‍या दोघांना पकडण्यासाठी गेलेल्या राहाता पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचे धाडस चोरांकडून झाले. यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असला, तरी सुदैवाने गंभीर प्रकार त्यांच्यावर ओढ़वला नाही. चोराची पोलिसांवर गोळीबार करण्याची हिंमत होते, ही बाब पोलिसांसह समाजासाठी अत्यंत घातक मानायला हवी.

श्रीरामपूर शहरात हुसेननगरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन कुटुंबांत लहान मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यातून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. एका कुटुंबातील व्यक्तीने औरंगाबाद येथील नातेवाईकांना बोलावले. त्यातून वाढलेल्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचे धाडस केले गेले. दुसर्‍या जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीची व्यक्ती जिल्ह्यात गावठी कट्टे घेऊन येत गोळीबार करत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील आठवड्यात नगर शहरातून उद्योजक करीम हुंडेकरी यांचे एका सराईत गुंडाने 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले. यात दोघांना अटक करण्यात आली असली, तरी मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांच्या गाफीलपणामुळे मुख्य आरोपी व त्याचा अन्य एक साथीदार निसटून गेल्याची चर्चा आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. पोलिसांनी या घटनेविषयी कमालीची गुप्तता बाळगली. अपहरण प्रकरणात बाहेरील अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आला आहे. या घटनेविषयी पोलीस तपासातून अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र मुख्य आरोपी सापडत नसल्याने पोलिसांची नाचक्की झाली आहे. एवढेच नव्हे, तर मुख्य आरोपीकडून हुंडेकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमक्या येत आहेत.

पारनेर शहरात एका तरुणावर दोघांनी भल्या सकाळी तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वर्चस्ववादातून हा प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे. श्रीरामपूर, नेवासा, राहुरीमध्ये या अगोदर वर्चस्ववादातून खून झाले आहेत. याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वी पारनेरमध्ये आला. शहरात दहशत निर्माण करण्यासाठी युवकावर तलवारीने वार करण्याची अमानुष पद्धत ही बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे द्योतक मानले जाते. अशा प्रवृत्तीला वेळीच जेरबंद न केल्यास जिल्ह्यातच वर्चस्ववादाला खतपाणी मिळेल. वाळू उपसा व यातून सहज उपलब्ध होणारा पैसा, हे गुन्हेगारी वाढण्याचे मूळ कारण मानले जात आहे.

यामुळे अनेक नवतरुण या मार्गाला लागले. यातून नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांनी डोके वर काढले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी अवैध वाळू उपशाबरोबरच गुन्हेगारांचे कंबरडे मोडले होते. ईशू सिंधू यांनी जळगाव जिल्ह्यात पांढर्‍या पोषाखातील दहशत मोडित काढली होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाळू उपशासह, जुगार, दारू विक्रीवर कारवाई करत अवैध धंद्याला चाप बसविला. काही सराईत गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत गुन्हेगारीला चाप बसविण्यासाठी प्रयत्न केला. सण-उत्सव काळात, लोकसभा-विधानसभा निवडणूक काळात उत्कृष्ट नियोजन केले. परंतु, जिल्ह्यातून गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. गुन्हेगारीत वाढ झाल्याचेे चित्र दोन महिन्यांपासून दिसत आहे.

गावठी कट्टाधारक शोधमोहीम हवी
काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील घोडेगाव व त्यानंतर श्रीरामपूर येथे वर्चस्ववादातून गोळीबार झाला. राहात्यामध्ये पोलिसालाच लक्ष्य केले. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी अवैध वाळू, जुगार, दारू विक्रीवर धडाकेबाज कारवाई करत आहेत. यामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून त्यांचा चापही बसला आहे. परंतु, गावठी कट्ट्यातून गोळीबार होण्याचे प्रकार वाढत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे असल्याची शंका नाकारता येत नाही. अवैध धंद्यांप्रमाणेच गावठी कट्टा बाळगणार्‍यांवरही कारवाई होण्याची गरज आहे.

चोर्‍यांचे सत्र सुरुच; मात्र कारवाई शून्य
नगर शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, मोबाईल यांच्या चोरीबरोबरच घरफोड्या, धूमस्टाईलने सोने पळविण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. शहरात अस

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post