शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या याचिकेवर आज सुनावणी
नवी दिल्ली- भाजपने अजित पवार यांच्यासह स्थापन केलेले सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेनेने आणि दोन्ही काँग्रेसने केला. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे संयुक्तपणे दाखल केलेल्या या याचिकेवर आज रविवारी दुपारी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे.
भाजपच्या या खेळीच्या विरोधात प्रथम शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनीसुद्धा याचिका दाखल करत असल्याचे सांगितले. या तिन्ही पक्षांतर्फे राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आणि भाजप सरकारविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
तिन्ही पक्षांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली आहे. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेणे आणि फडणवीस यांचा शपथविधी घेण्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये महाविकासआघाडीकडे पूर्ण बहुमत असून त्यासाठी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या याचिकेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी या याचिकेबद्दल साशंकता निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल जरी झाली तरी त्यावर तातडीने सुनावणी होणार नाही. जरी सुनावणी झाली तरी निर्णय यायला उशीर होईल, असा दावा अणेंनी केला आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापन करण्यावरून हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 11 आमदार फोडून भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि तातडीने देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीही उरकून टाकला. परंतु, आता राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार परत पक्षात परतले आहेत.
Post a Comment