पावणेतीन लाख शेतकर्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत अनुदान
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजने अंतर्गत 1 ऑगस्टपासून पात्र लाभार्थ्यापैकी डाटा आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार होता. मात्र, मोठ्या संख्येने डाटा आधार लिंकिंग प्रलंबित असल्याने पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे तातडीने शेतकर्यांनी डाटा आधार लिंकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या योजनेत 2 लाख 74 हजार शेतकर्यांना पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान, दुसर्या टप्यातील अनुदान 2 लाख 62 हजार शेतकर्यांना तर 62 हजार शेतकर्यांना तिसर्या टप्प्यातील प्रत्येकी दोन हजार असे वर्षभरातील 6 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. मात्र, असे असताना पात्र शेतकर्यांपैकी मोठ्या संख्येने शेतकर्यांचा डाटा आधार लिंकिंग प्रलंबित असल्याने ते या योजनेच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी तातडीने जवळच्या सेतू केंद्र, आपले सरकार केंद्रात जाऊन आधार लिंकीची दुरूस्ती अथवा नव्याने आधार लिकींग करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. यात आधार लिंकीच्या दुरूस्तीसाठी दहा रुपये आणि नव्याने आधार लिंकींगसाठी अवघे 15 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात साधारणपणे प्राथमिक माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेत 2 लाख 44 हजार शेतकरी पात्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे संकलित होती. प्रत्यक्षात आतापर्यंत या योजनेत ऑनलाईन पोर्टलवर 4 लाख 93 हजार शेतकर्यांच्या नावांची नोंदणी झालेली असून उर्वरित पात्र शेतकर्यांची नावे नोंदणी अथवा त्यांच्या आधार लिंकींगमध्ये चुकीची दुरूस्तीसाठी जिल्हा बँकेसह पोस्टल बँकेने देखील स्वयंस्फूर्तीने या योजनेत सहभाग नोंदविला असून ज्या शेतकर्यांची बँकेत खाती नाहीत त्यांची खाते सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या योजनेत शेतकर्यांना केंद्र सरकारकडून वर्षभरात तीन टप्प्यात 2 हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. 1 फेबु्रवारी 2019 पासून या योजनेची घोषण होवून योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एका माहितीनूसार जिल्ह्यात 3 लाखहून अधिक शेतकर्यांच्या बँक खात्यांचे आधार लिंक होणे बाकी असल्याचे समोर आले असून यामुळे शेतकर्यांनी तातडीने त्यांच्या खात्यांचे आधार लिंकींग अथवा त्याची दुरूस्ती करण्यास सांगण्यात आले आहे.
Post a Comment