'तडजोड' केली नाही, सिनेमातून काढलं: मंजरी फडणीस


माय नगर वेब टीम
पणजी - 'रोक सको तो रोक लो', 'जाने तू या जाने ना' आणि 'ग्रँड मस्ती' यांसारख्या सिनेमात प्रमुख भूमिका निभावलेली अभिनेत्री मंजरी फडणीसने बॉलिवूडमध्ये दीड दशक पूर्ण केलं आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात मंजरीने हिंदीशिवाय तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या प्रादेशिक सिनेमांमध्येही काम केलं. ती सध्या ५० व्या आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात तिचा आंतरराष्ट्रीय सिनेमा इंटरडिपेंडन्सच्या प्रीमिअरसाठी पणजीत आली आहे. यावेळी खास बातचीत करताना तिने कारकीर्दीतील चढउतार आणि कशा लोकांना तोंड द्यावं लागलं, तेही सांगितलं.
कामाच्या मोबदल्यात ‘तडजोड’ करण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत सिनेमा सोडणं पसंत केल्याचं मंजरी सांगते. ‘तडजोड’ न केल्यामुळे मोठ्या सिनेमांपासून दूर जावं लागलं आणि ज्या छोट्या सिनेमात काम केलं, ते बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले, असंही ती सांगते. या सर्व प्रकारामुळे अनेक दिवस तणावात राहिल्याचंही तिने सांगितलं.
'प्रवास धीम्या गतीने राहिला, पण मी खुश आहे'
‘मी कुठेही हरवलेली नाही, इथेच इंडस्ट्रीत आहे. तुम्ही बाहेरुन येता तेव्हा स्वतःचं स्थान निर्माण करणं सोपं नसतं. माझे वडील आर्मीत होते, सिनेमाशी कोणताही संबंध नव्हता, ना कुणाशी संपर्क होता. अशा परिस्थितीत आतापर्यंतच्या प्रवासाने मी समाधानी आहे. माझा पहिला सिनेमा 'रोक सको तो रोक लो'ने चांगली कमाई केली नव्हती. त्यामुळे माझा संघर्ष आणखी वाढला. जेवढंही काम केलं, ते चांगल्या लोकांसोबत केलं, प्रवास धीम्या गतीने राहिला, पण मी खुश आहे. स्टारडम, मोठा सिनेमा, छोटा सिनेमा हा सर्व आपला पाहण्याचा दृष्टीकोन आहे. मी काम करते हेच माझ्यासाठी खुप आहे,’ असा अनुभव मंजरीने सांगितला.
सिनेमा सतत अपयशी ठरत असल्यामुळे तणावात राहिल्याचंही मंजरीने सांगितलं. ‘प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. मग ते बिग बी अमिताभ बच्चन असतील किंवा शाहरुख खान. काम न मिळाल्यावर खुप रडायलाही यायचं. रात्र-रात्र जागायचे. अनेक नकारात्मक विचार यायचे. इंडस्ट्रीत ज्या पद्धतीने काम केलं जातं, त्याचीही अडचण होती,’ असं मंजरी म्हणाली. याशिवाय आपण आता पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून सकारात्मक झाले असल्याचंही ती म्हणाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post