खंजीर खुपसण्याच्या विधानाबाबत खा. राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे – आ. विखे



माय नगर वेब टिम
शिर्डी – राज्यात विधानसभा निवडणुकीत राज्याच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून भाजपचा आधार घेऊन शिवसेनेला जागा मिळाल्या आहे त्यामुळे खा. संजय राऊत यांनी खंजीर खुपसण्याच्या विधानाबाबत स्वतः आत्मपरीक्षण करावे, असे सूचक विधान राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत केले.

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. साईबाबा संस्थानच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्त ेविखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, गटनेते अशोक गोंदकर, भाजपचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर, नगरसेवक सुजीत गोंदकर, सुनील गोंदकर, कैलास कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते. साईदर्शनानंतर ना.विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ना.विखे पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा जनाधार मिळाला होता त्यामुळे भाजपचे सरकार सत्तेवर येईल असा आम्हाला पूर्ण विश्वास होता. राज्यपाल यांनी 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्हाला वेळ दिला असून मोठ्या संख्येने आम्ही बहुमत सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने विश्वास व्यक्त केला होता.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळायला पाहिजे होता; मात्र दुर्दैवाने ते घडले नाही. जनादेश आम्हाला असल्याने सरकार आमचेच होईल याची आम्हाला खात्री होती. खा. संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसण्याच्या विधानाबाबत स्वतः आत्मपरीक्षण करावे ,आपण काय कृती केली आहे हे जनतेने बघीतले आहे त्यामुळे त्याच्यावर मी आता भाष्य करण्यापेक्षा उद्याच्या काळात जनताच त्यांना उत्तर देईल असे सांगून राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन काम करु, असेही त्यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post