माय नगर वेब टीम
अहमदनगर- नवनीतभाईनी नगर शहराचा सर्वांगीन नियोजनबध्द विकास केला. सार्वजनिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण व मुलभूत सुविधा हा त्यांच्या विकास कामांचा पाया होता. आज जागतिक संशोधनातून हे सिध्द झाले आहे की, ज्या शहराचे शिक्षण व सार्वजनिक आरोग्य सुविधा दर्जेदार असतात ते शहर विकासाच्या बाबतीत किर्तीमान असतात. नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या संशोधनाचा संदर्भ देऊन आपणही सर्व सामंजस्य, सुज्ञ नगरकर व जाणकार कार्यकर्ते पक्ष, गट, तट विसरुन नवनीतभाईंच्या विचाराने नगर विकासाच्या मुद्दयावर एकत्र येण्याची गरज आहे. यामुळे शहराचा खुंटलेल्या विकासाला चालना मिळण्यास वेळ लागणार नसल्याचे प्रतिपादन लखनऊ विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले.
पत्रकार वसाहत येथील आचार्य गुंदेचा पत्रकार भवनमध्ये नवनीत विचार मंचच्या वतीने नवनीतभाई बार्शीकर यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. निमसे बोलत होते. यावेळी तत्कालीन बार्शीकर मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष मुथा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, नवनीत विचार मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता, अर्बन बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक रमेश परभाणे, निवृत्त सेवा संघाचे अध्यक्ष डी.एम. कुलकर्णी, रामविलास हेडा, शिरीष जोशी, शहर बँकेचे जनार्दन शिरसाठ, अर्शद शेख, हरीभाऊ डोळसे, पत्रकार विठ्ठल शिंदे, राजेश सटाणकर, बाबा ढाकणे, सतीश शहा, गिरीश वाळूंजकर, शिरीष खराडकर आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते नवनीतभाई बार्शीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पत्रकार भवनावर आचार्य गुंदेचा नवनीत नगर (सावेडी रोड) असा फलक लावून नवनीतभाई बार्शीकरांना आदरांजली वाहण्यात आली. या अभिवादन सभेत भाईंची आठवण जपण्यासाठी नवनीत नगर ठरावाची अंमलबजावणी व नगर विकासासाठी शोषित नगरकरांमध्ये जागृती आणि सर्वांगीन विकासासाठी नवनीत विचार मंचच्या माध्यमातून नियोजनबध्द पाऊल टाकण्याचा व्यक्त करण्यात आला. तर नगरपालिका ठरावाप्रमाणे लालटाकी पुढील सर्व सावेडी उपनगराला नवनीतनगर असे नांव देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी म्हणून सावेडी उपनगरात नवनीत नगरचे शंभर फलक लावण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आचार्य गुंदेचा पत्रकार भवन इमारतीवर नवनीतनगर नामफलक लावून करण्यात आला.
प्रास्ताविकात नवनीत विचार मंचचे अध्यक्ष सुधीर मेहेता यांनी नगरचे कार्यकर्ते हे विसरले की, आज भाईंच्या कर्तृत्व व कल्पकतेने आपण मुळेचे पाणी पितोय. जन्मापासून वैकुंठापर्यंतच्या सुविधा ही नवनीत भाईंचीच देण आहे. सारडा महाविद्यालय, लालटाकी, सावेडी, गुलमोहर, हडको व एमआयडीसी आदी नवनगर परिसर बहरला समृध्द झाला हे भाईंचेच कर्तृत्व. पण नगरच्या लोकप्रतिनिधींनी किती जाणीव ठेवली? आजच्या लोकप्रतिनिधींना भाईंच्या कार्याची जाण आणि चाड राहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाईंच्या प्रत्येक स्मृती व जयंती दिनी सर्व लोकप्रतिनिधींनी नगरविकास व भाईंचे नांव जपण्याच्या केवळ वल्गना केल्या. असे असले तरी सामान्य नगरकरांच्या मनात आजही नवनीतभाईबद्दल नितांत आदर असल्याचे स्पष्ट करीत, नवनीत विचार मंच नवनीतनगर नामकरण अंमलबजावणीसाठी सर्व मार्गांनी लढा आणि गांधीगिरी करणार असल्याचे त्यांनी नमुद केले. यासाठी सावेडी महानगर कार्यालय, अर्बन, मर्चंट आणि शहर बँके सारख्या मोठ्या कार्यालयांवर नवनीत नगरचा नामफलक लावून गांधीगिरी करणार असल्याची माहिती दिली.
डॉ.सर्जेराव निमसे यांना सर्व वक्त्यांनी आपण नगर विकासाच्या कामात नवनीत विचार मंचच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. त्यावर बोलताना डॉ.निमसे यांनी आजच्या राजकारणाचे सर्व पक्षांचे सूत्र हे इलेक्टिव मेरिट (निवडून येणाची क्षमता) असे झाले आहे. सर्वच राजकारण या भोवती फिरत आहे. त्यामुळे राजकारणाचे संपुर्ण चित्रच बदलले आहे. सुशिक्षित माणुस राजकारणापासून दूर पडू लागला आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नवनीतभाईंच्या काळात सर्वांगीन विकासाच्या कामामुळेच नगरकरांनी त्यांना आमदार, नगराध्यक्ष, अर्बन बँकेचे अध्यक्ष अशी तीन्ही सर्वोच्च सन्मानाची पदे दिली. नगरकरांचा भाईंवर नितांत प्रेम होता. आपण सर्व नगर विकासाच्या मुद्दयावर एकत्र आलो तर हा विश्वास आपण पुन्हा जिंकू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष मुथा यांनी भाईंच्या काळातील अनेक आठवणी सांगितल्या. सर्वात महत्त्वाचे भाईंचे नगर शहरावरचे प्रेम व विकास कामाची तळमळ याप्रमाणे आज कोण काम करतो? असा प्रश्न उपस्थित करुन आजजी शहराची दूरावस्था झाली त्याला आपण नगरकर जबाबदार असल्याचे सांगितले. आपण कोणत्याही अमिषाला बळी न पडता चांगल्या आणि सुसंस्कृत कार्यकर्त्यांना निवडणुकित काम करण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. मनी, मसल व मॅन पॉवरवर निवडणुका हे आजचे चित्र बदलण्याची गरज व्यक्त करुन आज मनपा झाली पण नांव मोठे लक्षण खोटे असल्यासारखे आहे. कुठल्याही सुविधा नाहीत मात्र कर भरमसाठ आहे. कोट्यावधीचा निधी येतो मात्र जातो कुठे? सुविधा देता येत नसेल तर पुन्हा नगरपालिका करण्याची त्यांनी मागणी केली. यावेळी डी.एम. कुलकर्णी, रामविकास हेडा, आर्किटेक अर्शद शेख, विलास बडवे, राजेश सटाणकर, हरीभाऊ डोळसे आदींनी मनोगत व्यक्त केली.
समारंभाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी प्रारंभीच नवनीत विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व नगरच्या प्रश्नावर जागृतीचे काम चालू असल्याचे कौतुक केले. मात्र आज लोकांची चांगल्या कामासाठी साथ मिळत नसल्याची व चांगले व सुशिक्षित नागरिक मतदानासाठी पैसे मागत असल्याची खंत व्यक्त केली. चांगल्या उमेदवारांना साथ न मिळाल्यास शहराचा विकास होणार कसा? नगरच्या पुढार्यांनी आज पर्यंन्त विकासाच्या फक्त घोषणा केल्या. विकासकामे यांच्यासाठी फक्त कुरणच बनले आहे. विकास कामातून त्यांनी स्वत:चा विकास साधला असल्याचा घणघाती हल्ला चढविला. नगरकरांनी सामाजिक, राजकीय जीवनात चांगल्या कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा सकारात्मक बदल केल्यास नगर विकास अवघड बाब नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आभार हरीभाऊ डोळसे यांनी मानले.
Post a Comment