मनपा आयुक्त भालसिंग यांचा आज निरोप समारंभ ; नव्या आयुक्तांचे महापालिकेला वेध
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिकेला नव्या आयुक्तांचे वेध लागले आहेत. विद्यमान आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांचा शासकीय सेवाकाळ शनिवारी (३० नोव्हेंबर) संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन कोणी अधिकारी येतो की, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडेच पुन्हा महापालिका आयुक्तपदाचा पदभार येतो, याची उत्सुकता महापालिकेत आहे. दरम्यान, भालसिंग यांचा निरोप समारंभ शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता महापालिकेच्या सभागृहात होणार आहे.
मूळचे नगरचे असले तरी शासकीय सेवेच्या अखेरच्या आठ-नऊ महिन्यांसाठी भालसिंग यांना नगरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. औरंगाबाद महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असताना मागील मार्च महिन्यात नगर शहर या मूळ गावी त्यांची बदली होऊन नगर महापालिकेच्या आयुक्तपदी बढती मिळाली. निवृत्तीला आठ-नऊ महिन्यांचा काळ राहिला असताना नगरला मिळालेल्या नियुक्तीमुळे फारसे काम करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यांचा सेवा काळ आता संपल्याने त्यांच्या जागी नवा कोणी अधिकारी येतो की जिल्हाधिकारी द्विवेदी यांनाच प्रभारी पदभार दिला जातो, याची उत्सुकता आहे. ८-९ महिन्यांपूर्वी भालसिंग नगरला रुजू होण्याआधी द्विवेदींकडेच महापालिकेचा पदभार होता व नगर महापालिकेची निवडणूक त्यांनी यशस्वी करताना महापालिकेच्या वसुलीला चालना दिली होती तसेच सीना नदीतील अतिक्रमणेही हटवली होती. त्यामुळे आता पुन्हा त्यांना महापालिकेची जबाबदारी मिळाली तर अशाच धडाकेबाज कामाची अपेक्षा त्यांच्याकडून आहे.
भालसिंग यांनी केले धाडस
नगरचे भूमिपुत्र या नात्याने शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आयुक्त भालसिंग यांनी केले. त्यांनी काही धाडसी निर्णयही घेतले. महापालिकेच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नगर रचना विभागात वर्षानुवर्षे राजकीय पाठबळावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना एका झटक्यात हटवण्याचा निर्णय़ भालसिंग यांनी घेतला. या विभागातील १७ पैकी तब्बल १४ जणांना त्यांनी अन्य विभागांतून नियुक्त्या दिल्या. संबंधितांना पुनर्स्थापना देण्याचे राजकीय दबावही झुगारले. तरीही शुक्रवारी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याकडे यासाठी प्रयत्न सुरू होते, हे विशेष. याशिवाय नगरच्या उपनगरांतील ओढे-नाले बुजवून त्यात सिमेंटचे पाइप टाकण्याची नगर रचना विभागाची 'किमया'ही भालसिंग यांनी मोडून काढण्याचे प्रयत्न केले. संबंधित पाइप हटवून ओढे-नाले पूर्ववत वाहते करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी ५-६ अधिकाऱ्यांवर जबाबदारीही दिली आहे. त्यामुळे हे आदेश प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आता या अधिकाऱ्यांवर असणार आहे. याशिवाय सीना नदीवरील स्टेशन रस्ता परिसरातील रखडलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण करणे तसेच पाणीपुरवठा योजनेत विळद जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बसवलेल्या जादा क्षमतेच्या वीज मोटारींसाठी वाढीव वीज दाब मिळण्यासाठी सुमारे पावणे तीन कोटींची रक्कम जमा केल्याने त्याचेही काम 'महावितरण'द्वारे सुरू झाले आहे. मोजकीच, पण शहराच्यादृष्टीने महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात भालसिंग यांना यश आले.
Post a Comment